Afghanistan Taliban: ...म्हणून तालिबान काश्मिरात शिरण्याची जोखीम पत्करणार नाही; जाणकारांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:21 AM2021-09-01T07:21:02+5:302021-09-01T07:21:57+5:30
अन्य अतिरेकी संघटनांपासून निर्माण होऊ शकतो धोका
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : अफगाणिस्तानतालिबानने कब्जात घेतल्याने तालिबानांच्या घुसखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी संस्था काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी तालिबानांचा आधार घेऊ शकते, असेही बोलले जाते. तथापि, काश्मीर आणि दहशतवादाच्या जाणकारांचे मात्र याबाबत वेगळे मत आहे.
दहशतवादाचा अनेक दशकापर्यंत मुकाबला करणाऱ्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या मते, तालिबानी काश्मीरमकडे वळण्याची शक्यता कमी आहे. त्यांचे सर्व लक्ष सत्तेवर आहे. काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे राजकीय विश्लेषक नूर अहमद बाबा यांचे असे म्हणणे आहे की, बदललेल्या परिस्थितीत लष्कर-ए-तोयबा आणि जैशसारख्या अन्य संघटनांपासून धोका होऊ शकतो.
...म्हणून ते काश्मीर प्रकरणात पडणार नाहीत
आजवर या संघटना अफगाणिस्तानमध्ये तालिबानला मदत करीत होत्या. परंतु, तालिबान अफगाणमध्ये सत्तेत आल्याने त्यांची गरज उरली नाही. या संघटना सर्व जोर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविण्यावर देऊ शकतात. याशिवाय तालिबानवर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी दबाब आहे, म्हणून ते थेट काश्मीरप्रकरणात पडणार नाहीत. संरक्षण तज्ज्ञ प्रवीण साहनी यांचे असे मत आहे की, आपल्या सत्तेला आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळविण्यावर तालिबानचे लक्ष असल्याने, ते दहशतवादात सामील होण्याची जोखीम पत्करणार नाही.