२०२९ पर्यंत अर्ध्या, तर या वर्षापर्यंत संपूर्ण भारतावर कब्जा करणार, तालिबानचा खतरनाक प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:31 PM2023-01-12T16:31:19+5:302023-01-12T16:32:52+5:30
Taliban Viral Video: अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने संपूर्ण जग कब्ज्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दहशतवादी संघटनेचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने संपूर्ण जग कब्ज्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दहशतवादी संघटनेचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तालिबानी सैनिक २०२९ पर्यंत अर्ध्या भारतावर कब्जा करण्याचा दावा करत आहेत. तसेच २०७० पर्यंत अर्ध्या जगावर तालिबानचा कब्जा होईल, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्याता आला आहे. तालिबानचा हा सैनिक अनेक देशांची नावं घेत आहे. सध्यातरी गुप्तचर यंत्रणा या व्हिडीओची पडताळणी करत आहेत. हा प्रोपेगंडा व्हिडीओ कुठे तयार करण्यात आला आणि त्याचा नेमका हेतू काय याचा शोध घेतला जात आहे.
गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांनुसार हा व्हिडीओ एका मिनिटापेक्षा अधिकचा आहे. त्यामध्ये दहशतवादी संघटना तालिबानचे सैनिक आपल्या हत्यारांचं प्रदर्शन करत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये जगातील कुठल्या देशावर कधी कब्जा केला जाईल हे क्रमवार पद्धतीने नमूद करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक नकाशा दाखवण्यात आला आहे. तसेच या नकाशामध्ये वेगवेगळ्या देशांची नावं लिहिण्यात आली आहे. तर नकाशाच्या शेजारी सुरू असलेल्या व्हिडीओमध्ये वर्षं दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला की, २०२९ पर्यंत अर्ध्या भारतावर, २०३२ पर्यंत अर्ध्या इराणवर, २०३५ पर्यंत संपूर्ण भारतावर, २०३७ पर्यंत तुर्कमेनिस्तानवर सन २०३० पर्यंत संपूर्ण इराणवर तर २०७० येईपर्यंत तालिबान रशियावर कब्जा करेल, असा दावा करण्यात आला आहे.
या संपूर्ण व्हिडीओमध्ये सुमारे एक डझन देशांची नावं घेण्यात आली आहेत. मात्र या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचं नाव घेण्यात आलेलं नाही. या व्हिडीओमध्ये तालिबानी सैनिक परेडच्या धर्तीवर वेगवेगळ्या देशांवर कब्जा दाखवत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कुठल्या दहशतवादी संघटनेने बनवला आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या व्हिडीओचा हेतू हा भोळ्याभाबड्या तरुणांना भरकटवून दहशतवादी संघटनांमध्ये सामील करून घेण्याचा आहे. मात्र हा व्हिडीओ पाकिस्तानी तालिबानचा आहे की अफगाणिस्तानमधील तालिबानचा आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.