दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानसोबत होऊ शकते चर्चा, भारताने दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 07:57 PM2018-01-11T19:57:06+5:302018-01-11T20:02:07+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दहशतवादासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ठप्प झाली आहे. मात्र पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याबाबत भारताच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर चर्चा होऊ शकते, असे संकेत भारताकडून देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दहशतवादासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ठप्प झाली आहे. मात्र पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याबाबत भारताच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर चर्चा होऊ शकते, असे संकेत भारताकडून देण्यात आले आहेत.
'We have said terror &talks cannot go together but talks on terror can definitely go ahead,' MEA Spokesperson Raveesh Kumar on Pakistan pic.twitter.com/EyTLEDfZUo
— ANI (@ANI) January 11, 2018
दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, पण दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा नक्कीच पुढे नेता येईल, असे भारताने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट झाल्याच्या वृत्तालाही भारताकडून दुजोरा देण्यात आला आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार नसीर खान जंजुआ यांची भेट २६ डिसेंबर रोजी बँकॉक येथे झाली होती. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याबाबत मौन पाळले होते.
I am agreeing that talks took place & our issue was eliminating terrorism from the region, we of course raised the issue of cross-border terrorism in those talks: MEA Spokesperson Raveesh Kumar on NSA level talks b/w India & Pakistan pic.twitter.com/DE26LaOyrL
— ANI (@ANI) January 11, 2018
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, "चर्चा आणि दहशतवाद एकत्रपणे चालू शकत नाहीत, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. पण अशी काही माध्यमे आहेत ज्यांच्याद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा सुरू असते. बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये चर्चा होत असते. त्याचपद्धतीने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली होती. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असे आम्ही सांगत असलो तरी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा निश्चितपणे पुढे जाऊ शकते."
डोवाल आणि त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेची संक्षिप्त माहितीसुद्ध रवीश कुमार यांनी यावेळी दिली. " या चर्चेवेळी भारताकडून सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा प्रश्न उपस्थित केला. तसेच ही चर्चा केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरच केंद्रित राहिली. दहशतवादाच्या झळा संपूर्ण देशाला बसू नयेत हे निश्चित करण्याला आमचे प्राधान्य आहे."
भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी पाकिस्तानच्या कारागृहामध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट घडवून आणण्यात आली होती. मात्र या मुलाखतीदरम्यान पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला दिलेल्या वागणुकीला भारताने अपमानास्पद मानले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जाधव यांच्या परिवारासोबत जे काही घडले ती त्यावेळची घटना होती. मात्र द्विपक्षीय चर्चेची तारीख त्याआधीच निश्चित झाली होती.
मात्र दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये अशा प्रकारची चर्चा कधी होईल याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.