लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर बोलतच राहीन - व्यंकय्या नायडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:59 AM2017-08-10T00:59:15+5:302017-08-10T01:00:28+5:30
माझ्याकडील नवीन जबाबदारीमुळे मला आता राजकारणावर बोलता येणार नाही आणि तसे बोलणे योग्यही नव्हे; परंतु लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मी उपस्थित करू नयेत, असाही त्याचा अर्थ नाही, असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी व्यक्त केले.
हैदराबाद : माझ्याकडील नवीन जबाबदारीमुळे मला आता राजकारणावर बोलता येणार नाही आणि तसे बोलणे योग्यही नव्हे; परंतु लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मी उपस्थित करू नयेत, असाही त्याचा अर्थ नाही, असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी व्यक्त केले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
नायडू हे गुरुवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत उद्या, १0 आॅगस्ट रोजी संपत आहे.
नायडू म्हणाले, यापूर्वी हे पद उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि झाकीर हुसेन यांनी भूषविले आहे. त्यांनी कशा पद्धतीने उपराष्ट्रपतिपदावर काम केले याचा मी अभ्यास करीत आहे. उपराष्ट्रपतिपदाची जबाबदारी असताना मी राजकारणावर बोलता कामा नये आणि तसे गृहीत धरूही नये आणि मीही अर्थातच बोलणार नाही. मात्र, लोकांच्या जिव्हाळ््याच्या आणि त्यांच्या भल्याच्या विषयांवर मी बोलू नये, असा त्याचा अर्थ असू शकत नाही. नवी जबाबदारी कशी पार पाडावी, यावर मी अधिकाºयांचाही सल्ला घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यसभेचे सभापती या नात्याने मी सभागृहात विधायक चर्चा कशा होतील, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. विरोधी बाकांवरील सदस्यांसह सगळ््यांना बोलण्याची संधी मिळेल असा प्रयत्न मी करीन, असे ते म्हणाले. सरकारी विधेयके सुलभतेने संमत होण्यासाठी मी प्रयत्न करीन.
विकासाचा अजेंडा हवा
समाजातील विशिष्ट वर्गात असलेले दारिद्य, निरक्षरता, आर्थिक विषमता, भेदभाव आणि हेळसांडीचे वातावरण याचा उल्लेख करून नायडू म्हणाले की, देशापुढील कार्यक्रम हा विकासाचा असला पाहिजे.
हैदराबाद शहराशी असलेल्या चार दशकांच्या संबंधांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की, आंध्रप्रदेशचे विभाजन झाले नव्हते, तेव्हा १९८०च्या प्रारंभी आंध्रप्रदेश विधानसभेच्या गं्रथालयात सदस्य या नात्याने मी कित्येक तास बसायचो. हैदराबादेत माझे पत्रकारांशी चांगले संबंध आहेत. माझ्या सार्वजनिक जीवनातील यशात त्यांचा मोठा सहभाग आहे.