मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित
By बाळकृष्ण परब | Published: November 18, 2020 08:28 AM2020-11-18T08:28:42+5:302020-11-18T08:32:01+5:30
Modi-Biden News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोदींनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल बायडेन यांचे अभिनंदन केले. यादरम्यान, मोदी आणि बायडेन यांच्यात कोरोनाची साथ, जागतिक तापमान वाढ आणि भारत-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्याबाबतही चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. त्यात ते म्हणाले की, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आम्ही भारत आणि अमेरिकेमधील रणनीतिक भागीदारीसाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच कोविड-१९ ची साथ, हवामानातील बदल आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्र यासारख्या संयुक्त मुद्द्यांवर चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्राध्यक्षच्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. कमला हॅरिस यांचे यश हे भारत आणि अमेरिकी समुदायाच्या लोकांसाठी गर्व आणि प्रेरणेचा विषय आहे.
Spoke to US President-elect @JoeBiden on phone to congratulate him. We reiterated our firm commitment to the Indo-US strategic partnership and discussed our shared priorities and concerns - Covid-19 pandemic, climate change, and cooperation in the Indo-Pacific Region.
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2020
यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी मोदींनी अध्यक्षीय निवडणूक जिंकल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले होते. भारत आणि अमेरिकेमधील संबंध अधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र मिळून काम करण्याची आशा व्यक्त करतो, असे म्हटले होते.
३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार असलेल्या जो बायडेन यांनी ३०६ मते मिळवली होती. तर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ २३२ मतांवर समाधान मानावे लागले होते. ५३८ इलेक्टोरल व्होट असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी २६८ मतांची आवश्यकता असते.