राष्ट्रवादी- भाजप छुप्या युतीची चर्चा संपुष्टात; राष्ट्रीय दर्जा काढल्याने मित्रपक्षांच्या शंका फिटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 07:15 AM2023-04-12T07:15:10+5:302023-04-12T07:15:22+5:30
राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणारे काही विशिष्ट लाभ, २३ वर्षांपासून असलेली प्रतिष्ठा
नवी दिल्ली :
राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणारे काही विशिष्ट लाभ, २३ वर्षांपासून असलेली प्रतिष्ठा; तसेच पक्ष कार्यालयासाठी राजधानी दिल्लीत मिळणारा बंगला वगळता दिल्लीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे काही गमवावे लागलेले नाही. उलट राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागल्यानंतर अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मित्रपक्षांच्या मनात निर्माण झालेल्या शंका संपुष्टात आल्या आहेत.
राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला १, केनिंग्ज लेन येथे पक्ष कार्यालयासाठी बंगला देण्यात आला आहे. तो बंगला रिकामा करण्याचे आदेश लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय आधी १०, बिशंभर दास मार्ग येथे होते. तेथून ते १ केनिंग्ज लेन येथे हलविण्यात आले होते.
राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली त्याच दिवशी २३ मार्च रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत ‘ईव्हीएम’संबंधांतील शंका-कुशंका संपविण्यासाठी निवडणूक आयोगाला जाब विचारण्याविषयी एकमत झाले होते. त्यावर पुन्हा विचारमंथन होऊ घातले होते; पण विरोधी पक्षांची दुसरी बैठक होण्याआधीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला.
अदानींवरून मित्रपक्षांच्या शंका निरर्थक
अदानीप्रकरणी जेपीसी चौकशीच्या मुद्यावरून शरद पवार यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या विसंगत भूमिका घेतली तेव्हा ते अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी आणि भाजपला मदत करीत असल्याची शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती; पण निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा रद्द केल्यानंतर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानच्या छुप्या सहकार्याविषयीच्या मित्रपक्षांच्या शंका निरर्थक ठरल्या आहेत.