पाकशी आता चर्चा फक्त बळकावलेल्या काश्मीरवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे ठाम प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 05:05 AM2019-08-19T05:05:56+5:302019-08-19T05:06:05+5:30
भारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
पंचकुला : आता यापुढे पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती फक्त त्यांनी बळकावलेल्या काश्मीरसंबंधीच होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी येथे ठणकावून सांगितले. भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या शुभारंभानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. हरयाणा विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ही यात्रा काढली जात आहे. सर्व ६० मतदारसंघांतून फिरून ८ सप्टेंबर रोजी तिचा रोहतकमध्ये समारोप होईल.
संरक्षणमंत्री म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे बंद केल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा होणे शक्य नाही आणि जरी चर्चा झालीच तरी ती त्यांनी बळकावलेल्या काश्मीरखेरीज अन्य कोणत्याही विषयावर होणार नाही.
पाकिस्तान जर दहशतवादाची कास सोडणार नसेल तर त्यांच्याशी चर्चा का आणि कशावर करावी, असाही त्यांनी सवाल केला. भारताने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्याने पाकिस्तान हतबल झाले असून आता काय करावे याची त्यांना चिंता लागली आहे, असे सांगून राजनाथ सिंग पुढे म्हणाले, आता पाकिस्तान आपली इभ्रत बचावण्यासाठी अनेक देशांना साकडे घालत आहे. पण अमेरिकेसारख्या
सर्वात बलाढ्य देशानेही पाकिस्तानला चपराक दिली असून भारताशी चर्चा करून प्रश्न सोडवायला सांगत आहे. पाकिस्तानने भारताला धमक्या द्याव्यात असे आम्ही काय पाप केले आहे, असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)
बालाकोटचा हल्ला झाला, याची पाककडूनच कबुली
भारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाच्या मार्गाने भारतास कमकुवत करू पाहत आहे. पण याला खंबीरपणे कसे उत्तर द्यायचे हे ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले.