कर्नाटक निवडणुकीत तामिळ व तेलगू मतेही ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 05:35 AM2018-04-18T05:35:57+5:302018-04-18T05:35:57+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तामिळ व तेलगू मते या वेळी कोणाला जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमधील १२ जिल्ह्यांच्या किमान ३२ मतदारसंघांत तेलगू भाषकांची मते निर्णायक ठरू शकतात.

 Tamil and Telugu votes will be decisive in the Karnataka elections | कर्नाटक निवडणुकीत तामिळ व तेलगू मतेही ठरणार निर्णायक

कर्नाटक निवडणुकीत तामिळ व तेलगू मतेही ठरणार निर्णायक

googlenewsNext

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तामिळ व तेलगू मते या वेळी कोणाला जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमधील १२ जिल्ह्यांच्या किमान ३२ मतदारसंघांत तेलगू भाषकांची मते निर्णायक ठरू शकतात. आंध्र प्रदेशला स्वतंत्र दर्जा देण्यास मोदी सरकार टाळाटाळ करीत असल्यामुळेच तेलगू देसमने सरकारमधून बाहेर पडण्याचा आणि पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तेलगू देसम सातत्याने भाजपाविरोधी भूमिका घेत आहे.
तेलगू देसमचे नेतेही कर्नाटकात जाऊ न तेलगू भाषिक मतदारांनी भाजपाला मतदान करू नये, असा प्रचार करणार आहेत. तसे प्रत्यक्षात घडले, तर या ३२ मतदारसंघांत भाजपाची अडचण होईल. हे सारे मतदारसंघ आंध्र प्रदेश, तसेच तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर आहेत. तेलगू देसमचा त्या भागांतील मतदारांवर प्रभाव असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तेलगू मतदारांनी कोणाला मतदान करावे, हे तेलगू देसमचे नेते सांगणार नाहीत. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री के. ई. कृष्णमूर्ती मध्यंतरी बेंगळुरूला गेले होते. त्यांनी तिथे तेलगू भाषकांनी भाजपाला मतदान न करण्याचे उघडपणे आवाहनही केले. त्यामुळे ती मते आम्हाला मिळतील, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.
दुसरीकडे कर्नाटकातील तेलगू भाषक कशा प्रकारे मतदान करणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. तेलंगणात सत्तेवर असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्रीय समितीचा भाजपाला पाठिंबा नाही. पण त्यांनी काँग्रेसलाही पाठिंबा न देता, एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री चंद्रेशखर राव हे त्या पक्षासाठी कर्नाटकात सभाही घेणार आहेत. सपा व बसपा यांनीही जनता दल(धर्मनिरपेक्ष)शी आघाडी केली असली, तरी या दोन पक्षांना कर्नाटकात फारसे स्थान नाही. मात्र, मागासवर्गीय मते त्यांच्यामुळे मिळतील, असे देवेगौडा यांना वाटत आहे.
कर्नाटकात तामिळ भाषकांची संख्या लक्षणीय आहे. बंगळुरू, शिमोगा, म्हैसुरू, रामनगरम, कोलार, हसन, मंड्या व चामराज नगर या जिल्ह्यांमध्ये तामिळ मते निर्णायक ठरू शकतात. कावेरी बोर्डाची स्थापना करण्यात मोदी सरकारने टाळाटाळ चालविली असल्याने तामिळ भाषिकही नाराज आहेत. त्यामुळे ते भाजपाला मतदान करणार नाहीत, असा काँग्रेसचा दावा आहे.
मात्र, कावेरी बोर्डाबाबतची कर्नाटक सरकारची भूमिकाही तामिळींना मान्य नाही. त्यामुळे काँग्रेस की भाजपा, असा पेच त्यांच्यापुढे असेल. सुमारे २0 ते २२ मतदारसंघांत तामिळींचे प्रमाण अधिक आहे. देवेगौडा यांचा पक्ष त्यामुळेच द्रमुकचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, कावेरी मुद्द्यावरून कर्नाटकातील कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणे द्रमुकला अडचणीचे ठरेल. ही तामिळ व तेलगू मते मिळवण्यात नेमके कोणाला यश येते आणि लिंगायत मते कोणाकडे जातात, यावर राज्यातील सत्तेचे गणित
ठरणार आहे.

राज्यात वोक्कालिगा समाज
१५ टक्के, तर लिंगायत २0 टक्के आहे. लिंगायत समाज काँग्रेसकडे जाणार असतील, तर वोक्कालिगा मते आपल्याकडे यावीत, यासाठी भाजपाचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तेलगू व तामिळ ही मते खूपच महत्त्वाची ठरणार आहेत.

काँग्रेसच्या २१८ जणांच्या यादीत ४२ लिंगायत उमेदवार असून, भाजपाचे ३१ लिंगायत उमेदवार आहेत. सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिल्यानंतर, लिंगायत मते मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांत चढाओढ लागली आहे.

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचा निर्णय भाजपाला मान्य नाही. लिंगायत हे हिंदू धर्माचा भाग आहेत, अशीच भाजपाची भूमिका आहे. लिंगायत मते एकगठ्ठा काँग्रेसकडे जाऊ नयेत, यासाठी भाजपाने काही मतदारसंघांत जोर लावला आहे. ज्या भागांत लिंगायत मतदार अधिक आहेत, तिथेच भाजपाने ताकद लावल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस व भाजपाच्या लिंगायत उमेदवारांमध्येच या वेळी चुरस होणार आहे.

Web Title:  Tamil and Telugu votes will be decisive in the Karnataka elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.