GST वरुन खिल्ली उडवणं पडलं महागात; व्यावसायिकाने बंद खोलीत मागितली अर्थमंत्र्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:21 PM2024-09-13T14:21:54+5:302024-09-13T14:27:24+5:30

तामिळनाडूतील एक हॉटेल व्यावसायिक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माफी मागत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tamil Nadu Annapoorna hotel MD made fun of GST then Apologise to Finance Minister Sitharaman | GST वरुन खिल्ली उडवणं पडलं महागात; व्यावसायिकाने बंद खोलीत मागितली अर्थमंत्र्यांची माफी

GST वरुन खिल्ली उडवणं पडलं महागात; व्यावसायिकाने बंद खोलीत मागितली अर्थमंत्र्यांची माफी

Annapoorna hotel MD Apologise :तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे झालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढे जीएसटीच्या तक्रारीचा पाढा वाचणे एकाला चांगलेच महागात पडलं आहे. तामिळनाडू येथे अन्नपूर्णा हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन यांनी वस्तू आणि सेवा करावर टिप्पणी केली होती. जीएसटीवर टीका केल्यानंतर श्रीनिवासन यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माफी मागावी लागली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तामिळनाडूतील प्रसिद्ध अन्नपूर्णा हॉटेलच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन यांनी  केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा करावर केलेल्या टिप्पणीबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माफी मागितल्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. तामिळनाडूतील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, तामिळनाडू हॉटेल्स असोसिएशनचे मानद अध्यक्ष श्रीनिवासन हे त्यांच्या कृतीबद्दल अर्थमंत्री सीतारामन यांची माफी मागताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये निर्मला सीतारामन, कोईम्बतूर दक्षिण भाजपचे आमदार वनाथी श्रीनिवासन आणि श्रीनिवासन एका खोलीत बसलेले दिसत आहेत. श्रीनिवासन यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यांचा अपमान करण्यासाठी हा व्हिडिओ भाजपने सार्वजनिक केल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे.

११ सप्टेंबर रोजी अर्थमंत्री सीतारामन यांनी कोईम्बतूरमध्ये उद्योगपती आणि हॉटेल व्यावसायिकांची भेट घेतली होती. यावेळी तामिळनाडू हॉटेल्स असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारे श्रीनिवासन यांनी जीएसटीच्या विसंगतींबद्दल उद्योगांच्या तक्रारींवर अर्थमंत्र्यांसमोरच भाष्य केलं. प्रत्येक वस्तूवर वेगवेगळा कर लावण्याच्या केंद्र सरकारच्या पद्धतीमुळे कॉम्प्युटरलासुद्धा मोजता येत नाहीत इतका गोंधळ निर्माण झाला आहे, अशी विनोदी टिप्पणी त्यांनी केली होती.

"समस्या अशी आहे की प्रत्येक वस्तूवर जीएसटी वेगळ्या पद्धतीने आकारला जातो. उदाहरणार्थ: पावावर जीएसटी नाही. जर तुम्ही त्यात क्रीम टाकले तर जीएसटी १८ टक्के होईल. यामुळे ग्राहक म्हणतात की त्यांना पाव हवा आहे आणि क्रीम वेगळी द्या. जेणेकरुन पैसे वाचवण्यासाठी ते स्वतः पावावर क्रीम लावू शकतील, श्रीनिवासन यांनी असे म्हणताच कार्यक्रमस्थळी हशा पिकला.

हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि अनेकांनी शेअर करून अर्थ मंत्रालयाची खिल्ली उडवली. यानंतर श्रीनिवासन यांनी वनाथी श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. वनथी यांनी सांगितले की, श्रीनिवासन यांनी स्वच्छेने माफी मागितली आहे. श्रीनिवासन यांनी अर्थमंत्र्यांना सांगितले की तुम्हाला नाराज करण्याचा माझा हेतू नाही.

मात्र श्रीनिवासन यांना अशी अपेक्षा नव्हती की त्यांची आणि अर्थमंत्र्यांची भेट व्हिडिओमध्ये कैद केली जाईल आणि व्हायरल केली जाईल. ते केवळ हॉटेल उद्योगाला जीएसटीच्या मोजणीत भेडसावणाऱ्या समस्या सांगत होते आणि संघटनेच्या वतीने तेच या कार्यक्रमात बोलतील असे ठरले होते,” असे श्रीनिवासन यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, भाजप नेत्यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे द्रमुक आणि काँग्रेस पक्षांनी जोरदार टीका केली आहे.
 

Web Title: Tamil Nadu Annapoorna hotel MD made fun of GST then Apologise to Finance Minister Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.