तामिळनाडूत भाजपच्या वाट्याला केवळ २० जागा; लोकसभेची एक जागाही अण्णा द्रमुकने सोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:26 AM2021-03-07T06:26:37+5:302021-03-07T06:27:06+5:30
भाजपला २० विधानसभा मतदारसंघ देताना कन्याकुमारी लोकसभेची जागाही अण्णा द्रमुकने दिली आहे
चेन्नई/नवी दिल्ली : तामिळनाडूत अण्णा द्रमुक व भाजप यांच्यातील जागावाटप पूर्ण झाले असून, भाजपच्या वाट्याला केवळ २० विधानसभा मतदारसंघ आले आहेत. भाजपने ६० जागांची मागणी केली होती. त्याचवेळी अण्णा द्रमुकने आम्ही फार तर २१ जागा सोडू, असे भाजपला सांगितले होते.
भाजपला २० विधानसभा मतदारसंघ देताना कन्याकुमारी लोकसभेची जागाही अण्णा द्रमुकने दिली आहे. भाजपने तेथून माजी केंद्रीय मंत्री पोण्ण राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. येथून २०१४ साली ते विजयी झाले होते. मात्र २०१९ मध्ये वसंतकुमार यांनी त्यांचा पराभव केला होता. या वेळी राधाकृष्णन हे भाजप व अण्णा द्रमुक आघाडीचे उमेदवार असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यात शनिवारी रात्री तब्बल तीन तास झालेल्या चर्चेअंती दोन्ही पक्षांमध्ये हा समझोता झाला. भाजपच्या २० उमेदवारांना अण्णा द्रमुक पूर्णपणे पाठिंबा देईल, असे नंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अण्णा द्रमुकने आपले सहा उमेदवार कालच जाहीर केले.