अवयवदान केल्यास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 05:32 PM2023-09-24T17:32:27+5:302023-09-24T17:33:11+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : तामिळनाडूचेमुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक मोठी घोषणा केली असून राज्यातील अवयवदानाला प्राधान्य मिळावे यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरं तर अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी घोषणा त्यांनी केली. इतरांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने कोणीही आपले अवयव दान करेल, त्याचे योगदान त्याग मानले जाईल, असे त्यांनी नमूद केले. तामिळनाडू सरकारचा हा निर्णय राज्यात अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आला आहे.
दरम्यान, २००८पासून दरवर्षी तामिळनाडूमध्ये २३ सप्टेंबर रोजी 'अवयवदान दिन' साजरा केला जातो. याच प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ही मोठी घोषणा केली. राज्य सरकार राज्यातील अवयवदान करणाऱ्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करेल, अवयवदान करून एखाद्याचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तींना हा राज्य सन्मान देण्यात येणार असल्याचे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑर्गन ट्रांसप्लांट युनिटची संख्या तेरा आहे. यासोबतच इतर सत्तावीस वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही यासंदर्भात सुविधा विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी देखील याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. तसेच हा निर्णय 'ब्रेन डेड' घोषित झालेल्यांच्या निस्वार्थ बलिदानाचा सन्मान करतो, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. २००८ मध्ये ऑर्गन ट्रांसप्लांटला सुरुवात झाली तेव्हा सतराशेहून अधिक जण अवयदानासाठी पुढे आले होते. तामिळनाडूत आतापर्यंत सहा हजारहून अधिक रुग्णांचे अवयवदान करण्यात आले आहे. यामध्ये हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत, आतडे, कॉर्निया, हाडे, त्वचा इत्यांदी अवयवांचा समावेश आहे.