तामिळनाडूचे मुख्यमंत्री, चार मंत्र्यांना नोटीस; शशिकलांची भेट घेतल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:59 AM2017-08-04T00:59:25+5:302017-08-04T00:59:26+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि इतर चार मंत्र्यांना मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश गुरुवारी दिले. अखिल भारतीय अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची या चार मंत्र्यांनी तुरुंगात भेट घेतली
मदुराई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि इतर चार मंत्र्यांना मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश गुरुवारी दिले.
अखिल भारतीय अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची या चार मंत्र्यांनी तुरुंगात भेट घेतली, त्यामुळे मंत्र्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका न्यायालयात करण्यात आल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला. काही महिन्यांपूर्वी चार मंत्र्यांनी शशिकला यांची तुरुंगात भेट घेतल्याच्या आरोपानंतर पलानीस्वामी यांनी या मंत्र्यांना प्रश्न विचारला नाही, या आरोपावर मदुराई खंडपीठाने त्यांना स्पष्टीकरण मागितले आहे.
शशिकला या भ्रष्टाचाराच्या खटल्यात तुरुंगवास भोगत असून मंत्र्यांनी त्यांची भेट सरकारच्या कामकाजाची चर्चा करण्यासाठी घेतली. अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे दिवंगत माजी आमदार तमाराईकणी यांचा मुलगा अनाळगन यांनी दाखल केलेली ही याचिका न्या. के. के. शशिधरन आणि न्या. जी. आर. स्वामीनाथन यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली असताना पलानीस्वामी आणि त्यांचे चार मंत्री के. ए. सेंगोत्तायन, दिंडिगड श्रीनिवासन, कामराज आणि एस. के. राजू आणि राज्य विधिमंडळाचे सचिव यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या नोटीसला ७ आॅगस्टला उत्तर द्यायचे आहे.
याचिकाकर्त्याने मंत्र्यांनी शशिकला यांची तुरुंगात घेतलेली भेट ही मंत्र्यांनी मंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचे उल्लंघन असल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, असे म्हटले. या मंत्र्यांना न खडसावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनाही अपात्र ठरवावे, अशीही याचिकेत मागणी आहे. (वृत्तसंस्था)
पक्षानेच मान्य केले आहे
पक्षाचे प्रवक्ते गौरी शंकर यांनी २२ फेब्रुवारी मुलाखतीत राज्य सरकार शशिकला यांचा सल्ला आणि मार्गदर्शनानुसार चालवले जात आहे, असे म्हटले होते.
गौरी शंकर यांचे हे म्हणणे कोणत्याही मंत्र्याने नाकारलेले नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय २८ फेब्रुवारी रोजी चारही मंत्र्यांनी आम्ही शशिकला यांची तुरुंगात सरकारच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचे मान्य केले, असा आरोपही याचिकेत करण्यात आलेला आहे.
आमचे सरकार शशिकला यांचा सल्ला आणि मार्गदर्शनानुसार चालते या मंत्र्यांच्या कबुलीमुळे मुख्यमंत्री आणि चार मंत्र्यांनी घटनेचे उल्लंघन केल्याचे अनाळगन यांनी म्हटले.