तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 10:46 PM2024-09-28T22:46:43+5:302024-09-28T22:47:39+5:30
Udhayanidhi : उदयनिधी हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.
चेन्नई: तातामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली असून उद्या म्हणजेच २९ सप्टेंबरला चेन्नई येथील राजभवनात उदयनिधी स्टॅलिन यांचा शपथविधी होणार आहे. उदयनिधी हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.
मंगळवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते असे संकेत दिले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळात देखील बदल होऊ शकतात असे म्हटले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यासह व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी, आर. राजेंद्रन आणि थिरू एसएम नासर यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. नवीन मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दुपारी ३.३० वाजता चेन्नई येथील राजभवनात होणार आहे.
दरम्यान, तामिळनाडू सरकारने नुकतेच सुप्रीम कोर्टातून जामिनावर सुटलेल्या सेंथिल बालाजी यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दूध आणि दुग्धविकास मंत्री टी. मनो थंगाराज, अल्पसंख्याक कल्याण आणि अनिवासी तमिळ कल्याण मंत्री के. एस. मस्तान आणि पर्यटन मंत्री के. रामचंद्रन यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफारसही केली. मुख्यमंत्र्यांच्या या शिफारसीला राज्यपालांनीही मान्यता दिली आहे.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगमच्या (DMK) विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उदयनिधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच, या निवडणुकीत पक्षाला विजय मिळवता आला. त्यामुळे आता उदयनिधी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवायचा आहे.
Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin appointed as Deputy CM of Tamil Nadu.
— ANI (@ANI) September 28, 2024
The swearing-in ceremony will be held on September 29 at 3.30 pm at Raj Bhavan, Chennai pic.twitter.com/GJ9et93Ms8
उदयनिधी कायम चर्चेत
काही दिवसांपूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्मावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. सनातन धर्म हा डेंग्यू मलेरियासारखा आहे, तो संपवायला हवा, असे विधान त्यांनी केले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. एका कार्यक्रमात बोलताना उदयनिधी म्हणाले होते की, सनातन धर्म संपवण्यासाठी आयोजित संमेलनात मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. सनातन धर्माला विरोध करण्याऐवजी सनातन धर्म संपवायला हवा. मच्छर, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यासारख्या गोष्टी ज्यांना आपण विरोध करू शकत नाही, आपल्याला ते संपवायला लागेल, असे उदयनिधी यांनी म्हटले होते. तसेच, कोरोना काळात जनसंपर्क अभियान राबवल्यामुळे पोलिसांनी उदयनिधी यांना अटक केली होती. त्यानंतर काही तासात सोडून दिले. २०२१ साली भाजपा नेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या मृत्यूवर केलेल्या विधानामुळेही उदयनिधी चर्चेत आले होते.