नमो नम:! शेतकऱ्यानं 1 लाख रुपये खर्चून उभारलं नरेंद्र मोदींचं मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 03:49 PM2019-12-26T15:49:25+5:302019-12-26T16:06:32+5:30
शेतकऱ्याने आपल्या शेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले आहे.
नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना सुरु केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्यामुळे तामिळनाडूमधील पी. शंकर या शेतकऱ्याने आपल्या शेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले आहे. नरेंद्र मोदींच्या या निर्णयाबद्दल त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतामध्ये मंदिर बांधलं असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले.
पी. शंकर यांनी नरेंद्र मोदींचे मंदीर उभारण्यासाठी 1 लाख 20 हजारांचा खर्च केला असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा झाला. तसेच नरेंद्र मोदी यांनी कृषी सन्मान योजनेची घोषणा केल्यानंतर मला खूप झाला. यानंतर मी त्यांचे मंदीर बांधण्याचं ठरवलं होतं. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी निवडून यावे यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधीच या मंदिराचे बांधकाम केलं असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले.
तामिळनाडूमधील इराकुडी गावामध्ये 'नमो मंदीर' या नावाने नरेंद्र मोदी यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच आजूबाजूच्या गावामधील लोकं देखील आता पी. शंकर यांनी बांधलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येतात. मी या मंदिरामध्ये पुजा करण्यासाठी एक पुजारी ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद होईपर्यंत मी स्वत: पुजा करत असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांतर्गत मला 2000 रुपये, गॅस जोडणी व शौचालय देखील बांधून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक भाजपाचे नेत्यांना या मंदिराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पी. शंकर यांना भाजपा पक्षात प्रवेश करुन देशहिताचे काम करण्याचे आवाहन केले. यानंतर पी. शंकर यांनी आवाहन स्वीकारत पक्षासाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
पी. शंकर मंदिरात नरेंद्र मोदी यांची धातूची मुर्ती उभारणार होते. मात्र आधीच मंदिर उभारण्यासाठी लाखांचा खर्च झाल्याने मी दोन फूट सिमेंटची मुर्ती बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगतिले. या मंदिरात महात्मा गांधी, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे नेते के. कामराज, एआयएडीएमकेचे नेते एमजी रामचंद्रन आणि जे. जयललीता, गृहमंत्री अमित शहा, तामिळनाडूनचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांचे फोटो लावण्यात आले आहे.