मोदींनी भेटावं तरी नाहीतर आत्महत्येची परवानगी द्यावी, तामिळनाडूमधील शेतक-यांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 03:29 PM2017-08-22T15:29:42+5:302017-08-22T15:32:34+5:30
'एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे'
नवी दिल्ली, दि. 22 - केंद्र सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळत नसल्याने जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या तामिळनाडूमधील शेतक-यांनी आत्महत्येची परवानगी मागितली आहे. शेतक-यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं असून, त्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंतीच करण्यात आली आहे. एकतर आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करु दे असं शेतक-यांनी सांगितलं आहे.
निवेदनात शेतकरी संघटनेने आमचं कर्ज माफ करा तसंच दुष्काळ निधी म्हणून 40 हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 'कृपया आमच्या मागण्या मांडण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी द्या. नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या', असं शेतक-यांनी निवेदनातून सांगितलं आहे. तामिळनाडूमधील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. जंतर मंतरवर गेल्या 37 दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरु आहे.
'मंत्रालयाने आमचं निवेदन स्विकारावं अशी विनंती आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक असून पिकांचं नुकसान झाल्याने हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. राष्ट्रपतींनी आम्हाला भेटावं, आमच्याशी चर्चा करुन समस्या समजून घ्यायला हव्यात. नाहीतर आम्ही आत्महत्या करु', असं वक्तव्य आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले प्रेम यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे कर्नाटकात कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या सुरु असून एका महिन्यात 90 शेतक-यांनी जीवनयात्रा संपवली आहे. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे.