डॉक्टरांना पाहून जंगलात पळायचा, १३ मुलांचा बाप नसबंदीसाठी असा तयार झाला; वाचा रंजक कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 06:33 PM2023-04-03T18:33:43+5:302023-04-03T18:35:59+5:30
एकाबाजूला देशात 'हम दो, हमारे दो' यासाठीचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे तामिळनाडूच्या इरोडमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे.
इरोड-
एकाबाजूला देशात 'हम दो, हमारे दो' यासाठीचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे तामिळनाडूच्या इरोडमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. जिथं एक व्यक्ती १३ मुलांचा बाप झाल्यानंतर अखेर नसबंदी करण्यासाठी तयार झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ४६ वर्षीय व्यक्तीची समजूत काढण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांपासून ते अगदी पोलिसांनी देखील जंगजंग पछाडले. तेव्हा कुठं जाऊन चिन्ना मथैयन नावाचा १३ मुलांचा बाप नसबंदीसाठी तयार झाला. गेल्याच आठवड्यात चिन्ना याची पत्नी शांती हिनं १३ व्या मुलाला जन्म दिला.
मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा-जेव्हा आरोग्य विभागाची टीम मथैयन यांची समजूत घालण्यासाठी पोहोचायची. तो जंगलात पळून जायचा. त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं.
नसबंदीला धार्मिकदृष्ट्या चुकीचं मानायचा
इरोड जिल्ह्यातील अंधियुर जवळील गावातील असलेल्या या जोडप्यानं धार्मिकदृष्ट्या नसबंदी स्वीकारली नाही. या जोडप्यानं गेल्या काही वर्षांत कुटुंब नियोजन पूर्णपणे नाकारलं आहे. या जोडप्याला सात मुलं आणि पाच मुलींसह १२ अपत्य आहेत. शांती यांनी बुधवारीच एका मुलाला जन्म दिला. ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. के शक्ती कृष्णन म्हणाले की, स्थानिक पोलिस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने चार दिवसांच्या समुपदेशनानंतर मथैयन यांना पुरुष नसबंदी करण्यासाठी मन वळवण्यासाठी सतत प्रयत्न केले.
आरोग्य पथक पोहोचल्यावर जंगलात पळायचा
शक्ती कृष्णन म्हणाले, "नसबंदी प्रक्रियेसाठी रुग्णालयात नेण्यापूर्वी आम्ही जोडप्याच्या कुटुंबाला पाच दिवसांचे किराणा सामानंही दिले होते" नुकत्याच झालेल्या प्रसूतीनंतर शांतीची शारीरिक स्थिती कमकुवत झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर तिनं दुसर्या मुलाला जन्म दिला तर तिचा मृत्यू होईल. त्यामुळेच आम्ही मथैयनवर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मथैयन यांची समजूत घालण्यासाठी टीमने आठ वेळा त्यांच्या गावाला भेट दिली. यादरम्यान, जेव्हा जेव्हा वैद्यकीय पथक समुपदेशनासाठी त्याच्या गावी जायचे तेव्हा मथैयन अंधीयुर येथील राखीव जंगलात गायब व्हायचे.
पत्नीची प्रकृती बिघडल्यानंतर घेतला निर्णय
पत्नीच्या खराब प्रकृतीबद्दल समजावून सांगितल्यानंतर मथैयननं शेवटी नसबंदी करण्यास सहमती दर्शविली. रविवारी सकाळी मथैयन यांची अंधियूर येथील सरकारी रुग्णालयात नसबंदी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. ऑपरेशनच्याच दिवशी त्याला रात्री घरी सोडण्यात आलं.