तामिळनाडूत पुरामुळे तिघांचा मृत्यू, ट्रेनमध्ये ८०० प्रवासी अडकले; NDRFच्या दोन टीम रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 11:36 AM2023-12-19T11:36:38+5:302023-12-19T11:37:21+5:30
पूरग्रस्त भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकिटे आणि इतर आवश्यक वस्तू टाकल्या जात आहेत.
तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडूमध्येपाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यात रविवारी अनेक ठिकाणी ५२५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे थुथुकुडीमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजाने पुरामुळे त्रस्त लोकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूरग्रस्त भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकिटे आणि इतर आवश्यक वस्तू टाकल्या जात आहेत.
#WATCH | Thoothukudi, Tamil Nadu: Floods in various parts of the city as heavy rainfall continues to impact life and property. pic.twitter.com/9csZlFFA9N
— ANI (@ANI) December 19, 2023
ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत सुमारे ६७० मिमी आणि ९३२ मिमी पावसामुळे तिरुनेलवेली आणि तुतीकोरीन जिल्ह्यात रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानके जलमय झाली आहेत. त्याच वेळी, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे, ८०० प्रवासी तिरुचेंदूर आणि तिरुनेलवेली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांना स्थानिक जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. एनडीआरएफने म्हटले आहे की त्यांची दोन टीम अडकलेल्या रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
हवामान खात्यानूसार तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारीही हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. चेन्नई हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील तीन तासांत तामिळनाडूच्या कराईकल आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. थेनी, तेनकासी, कन्याकुमारी, थिरुनेलवेली, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.तमिळनाडूच्या किनारी भागात केप कोमारिनमध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अनेक नद्या आणि तलाव ओसंडून वाहत आहेत. पूरस्थिती पाहता कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तुतीकोरीन आणि तेनकासी येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.