राज्यपालांकडून महिला पत्रकाराचा विनयभंग; भर कार्यक्रमात गालाला हात लावल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:29 AM2018-04-18T09:29:10+5:302018-04-18T09:29:10+5:30
राज्यपाल पुन्हा एका वादात
चेन्नई: सेक्स फॉर डिग्री प्रकरणामुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवावे लागतील, अशी 'ऑफर' विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका निर्मला देवी यांनी चार विद्यार्थिनींना दिली होती. याबद्दलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आणि याप्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्यानं तामिळनाडूत एकच खळबळ उडाली. त्यामुळेच याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र या परिषदेत त्यांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. त्यामुळे पुरोहित पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत केला. राज भवनात ही पत्रकार परिषद झाली. मात्र याठिकाणी राज्यपालांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. यानंतर महिला पत्रकारानं ट्विट करत याबद्दल संताप व्यक्त केला. 'पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला,' असं महिला पत्रकारानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I asked TN Governor Banwarilal Purohit a question as his press conference was ending. He decided to patronisingly – and without consent – pat me on the cheek as a reply. @TheWeekLivepic.twitter.com/i1jdd7jEU8
— Lakshmi Subramanian (@lakhinathan) April 17, 2018
द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार कनिमोळी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला. 'या प्रकरणात राज्यपालांच्या कृतीविषयी संशय व्यक्त केला नाही, तरीही घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या मर्यादा समजायल्या हव्यात. त्यांनी महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला आहे. त्यांनी तिचा सन्मान राखलेला नाही,' असं ट्विट कनिमोळी यांनी केलं आहे.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिकेनं चार विद्यार्थिनींना मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली होती. या प्राध्यापिकेला सोमवारी पोलिसांनी अटक केली. निर्मला देवी असं या प्राध्यापिकेचं नाव आहे. 'मदुराई कामाराज विद्यापीठाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास त्या बदल्यात चांगले गुण आणि पैसे मिळतील,' अशी ऑफर निर्मला देवीनं दिली होती.