तामिळनाडू: राज्यपालांनी मंत्री बालाजींना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय स्थगित केला; कायदेशीर सल्ला घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 08:50 AM2023-06-30T08:50:36+5:302023-06-30T08:50:59+5:30
रवी यांनी रात्री उशिराने स्टॅलिन यांना पत्र लिहून स्टे आणल्याचे कळविले आहे.
चेन्नई : ईडीने अटक केल्यामुळे तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना तामिळनाडूच्या राज्यपालांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. परंतू, राजकारण तापल्यामुळे राज्यपाल आर. एन. रवी यांनी आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली आहे. राज्यपाल आता यासाठी अटॉर्नी जनरलकडून सल्ला घेत आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या शिफारसीशिवाय राज्यपालांनी ही कारवाई करण्यात आली होती. बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. नोकरी लावण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडी याची चौकशी करत आहे.
रवी यांनी रात्री उशिराने स्टॅलिन यांना पत्र लिहून स्टे आणल्याचे कळविले आहे. अटॉर्नी जनरलसोबत याबाबत चर्चा करेन. त्यांचा कायदेशीर सल्ला घेणार आहे असे राज्यपालांनी म्हटले आहे. बालाजी यांच्या बरखास्तीविरोधात स्टॅलिन यांनी कायदेशीर आव्हान देणार असल्याचे जाहीर केले होते.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मंत्रिपदावर असलेले सेंथिल तपासावर प्रभाव पाडू शकतात; तसेच ते अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा निर्णय राज्यपाल आर. एन. रवी यांनी घेतला. व्ही. सेंथिल बालाजी हे ईडी तपास करत असलेल्या एका प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.