तामिळनाडू, केरळमध्ये आलेल्या चक्रीवादळात 8 जणांचा मृत्यू, शाळा, महाविद्यालये बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 10:36 PM2017-11-30T22:36:51+5:302017-11-30T22:39:30+5:30
नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि जोरदार वा-यासोबत तामिळनाडू आणि केरळ धडक मारणा-या ‘ओखी’ चक्रीवादळ आता लक्षद्वीप बेटाच्या दिशेने सरकले आहे.
नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि जोरदार वा-यासोबत तामिळनाडू आणि केरळ धडक मारणा-या ‘ओखी’ चक्रीवादळ आता लक्षद्वीप बेटाच्या दिशेने सरकले आहे. या चक्रीवादळाचा केरळ आणि तामिळनाडूला सर्वाधिक फटका बसला आहे. चक्रीवादळात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ आणि तामिळनाडूला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दोन्ही राज्यांतल्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. केरळच्या व्हिजिंगमजवळ हिंद महासागरातल्या ओखी चक्रीवादळात 6 नौकांसह मच्छीमार आणि एक मरीन इंजिनीअरिंग जहाज हरवलं आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दक्षिण नौसैनिक कमांडनं 3 युद्धनौका आणि 2 हवाई जहाज कामाला लावले आहेत. तसेच हे नौसैनिक हरवलेल्या लोकांना सुखरूपरीत्या बाहेर काढण्यासाठीही तयार असल्याची माहिती मिळाली आहे.
चक्रीवादळाचा जोर पाहता दोन डिसेंबर रोजी ‘ओखी’ चक्रीवादळ लक्षद्वीप बेटावर थडकण्याची दाट शक्यता वसुंधरा विज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केली आहे. हे चक्रीवादळ पुढच्या 24 तासात लक्षद्वीप बेटाकडे वेगाने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी अरबी समुद्राच्या दक्षिण भागात शुक्रवारपासून वेगवान वा-यासह जोरदार पाऊस होईल, असे वसुंधरा विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले.
#CycloneOckhi lies at about 130 km southwest of Thiruvananthapuram, likely to move towards Lakshadweep Islands area: IMD Chennai
— ANI (@ANI) November 30, 2017
चक्रीवादळाच्या प्रभावाने लक्षद्वीप बेटाला पुराचा जोरदार तडाखा बसू शकतो, असा अंदाज स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी व्यक्त केला आहे. पुढील चोवीस तासांत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळमध्ये दूरवर जोरदार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच पुढील 12 तासांत ताशी 55 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून ते ताशी 75 किलोमीटर वेगाने लक्षद्वीप बेटावर थडकतील. त्यानंतर वादळाचा जोर आणखी वाढत जाईल. गुरुवारी रात्रीपासून वा-याचा जोर ताशी 90 ते 100 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Damage Expected over south Kerala (Alappuzha, Kottayam, Idukki, Kollam, Pathanathitta, Thiruvananthapuram districts), adjoining districts of south #TamilNadu (Kanyakumari, Tutukudi and Tirunelveli districts) .#CycloneOckhi
— NDMA India (@ndmaindia) November 30, 2017
कन्याकुमारी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले...
तडाखेबाज वा-यासह मुसळधार पावसाने तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्याला चांगलेच झोडपले असून अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उखडून कोसळली आहेत. जोरदार वारे आणि पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित असून पाऊस आणि वा-याचा जोर पाहता येथील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बंगालच्या उपसागरातून घोंगावत निघालेल्या या वादळाचा जोर पाहत तामिळनाडूतील स्थिती आणखी गंभीर होण्याचा ईशारा देण्यात आला आहे. दबाव क्षेत्राचे केंद्र कन्याकुमारीपासून दक्षिण आणि आग्नेयला 500 किलोमीटर दूर आहे. पुढच्या दोन दिवसांत हा दबावाचा पट्टा नैऋत्येकडे सरकरण्याची शक्यता आहे. परिणामी कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तुतीकोरीन, रामनाथपुरम, शिवगंगा आनणि विरुथुनगर या भागात जोरदार ते तडाखेबंद पाऊस होण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कन्याकुमारीसह तिरुनवेली, तुतीकोरीन, विरुथुनगर आणि तंजावूर येथील शैक्षणिक संस्था बंदच होत्या.
वादळाचे श्रीलंकेत चार बळी...
श्रीलंकेत वादळासोबत पावसाच्या तडाख्याने चार जण ठार झाले असून हवाई वाहतूकही कोलमडली आहे. चेन्नईहून कोलंबोकडे जाणारी श्रीलंकन एअरलाईन्सची दोन विमाने अन्य मार्गे वळवावी लागली. श्रीलंकेतील मध्य, पश्चिम आणि दक्षिण प्रांतामधील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. डोंगरी जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली असून वीज पुरवठाही प्रभावित झाला आहे.