आधी म्हटलं “हिंदी भाषिक आमच्याकडे पाणीपुरी विकतात,” आता तामिळनाडूच्या मंत्र्याची सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 08:35 AM2022-05-14T08:35:37+5:302022-05-14T08:35:57+5:30
Tamil Nadu minister Ponmudy : तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनीही हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे.
Tamil Nadu minister Ponmudy : तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे, असे ते म्हणाले. तसेच, हिंदी ही ऐच्छिक असली पाहिजे, मात्र अनिवार्य नसावी असं सांगत हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकत असल्याचं वक्तव्य पोनमुडी यांनी केलं होतं. दरम्यान, आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे.
“आपलं वक्तव्य उत्तरेकडील राज्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये असलेल्या कमतरतेसंदर्भात होतं. तामिळनाडूतील लोक उत्तरेकडील राज्यात जाऊन काम करतात. उत्तरेकडील राज्यांमध्ये काम उपलब्ध नसल्याने उत्तरेकडील वेगवेगळे लोक येथे येऊन काम करतात या अर्थाने मी हे बोललो,” असं स्पष्टीकरण पोनमुडी यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं. तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनीही हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. भारथिअर विद्यापीठ कोईम्बतूर येथे शुक्रवारी दीक्षांत समारंभात पोनमुडी यांनी संबोधित केलं. यावेळी भाषा म्हणून इंग्रजी ही हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. हिंदी भाषिक लोक नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. कोईम्बतूरमध्ये हिंदी भाषिक पाणीपुरी विकत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं.
काय म्हणाले होते पोनमुडी?
दरम्यान, पोनमुडी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील फायदेशीर पैलू लागू करण्याचे आश्वासन दिलं. परंतु राज्य सरकार केवळ दोन-भाषा प्रणाली लागू करण्याचा निर्धार असल्याचा दावा केला. दीक्षांत समारंभात तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करताना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून आधीच शिकविली जात असताना हिंदी का शिकली पाहिजे, असा सवाल त्यांनी केला.