"थोडा वेळ थांब, मी परत येईन"; मृत आईच्या पायाला स्पर्श करुन बोर्डाच्या परीक्षेला बसला मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:14 IST2025-03-04T16:09:23+5:302025-03-04T16:14:13+5:30
तमिळनाडूमध्ये परीक्षेपूर्वी आईचे निधन झाल्यानंतरही बारावीच्या विद्यार्थ्याने तिचे आशीर्वाद घेत परीक्षा दिली आहे.

"थोडा वेळ थांब, मी परत येईन"; मृत आईच्या पायाला स्पर्श करुन बोर्डाच्या परीक्षेला बसला मुलगा
तमिळनाडूमध्ये बारावीच्या एका विद्यार्थ्यासोबत हृदयद्रावक घटना घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तामिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लीयुर इथल्या विद्यार्थ्यासोबत अतिशय दुःखद प्रसंग घडला आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी बारावीच्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या निधनानंतरही विद्यार्थ्याने आपले दुःख बाजूला ठेवून बारावीची परीक्षा दिली. परीक्षेला जाण्याआधी विद्यार्थ्याने मृत आईचे दर्शन घेतलं. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थ्याच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.
तिरुनेलवेली जिल्ह्यातील वल्लीयुर येथील सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याने अनोखा आदर्श घालून दिला आहे. अण्णा नगरमध्ये राहणाऱ्या कृष्णमूर्ती यांची पत्नी सुबललक्ष्मी यांचे सोमवारी निधन झाले. तर कृष्णमूर्ती यांचे ६ वर्षांपूर्वीचं निधन झालं होतं. कृष्णमूर्तींच्या जाण्यानंतर सुबललक्ष्मी यांनी त्यांच्या मुलांना वाढवले. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे सोमवारी सुबललक्ष्मी यांचे निधन झाले. सुबललक्ष्मी यांच्या निधनाने दोन्ही मुलांवरील आई वडिलांचे छत्र हरपलं आहे. मात्र अशातही सुनील कुमारने दुःखात तमिळ भाषेची परीक्षा दिली.
दुपारी सुनील कुमार घरी परतल्यानंतर सुबललक्ष्मी यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. परीक्षेला जाण्यापूर्वी सुनील कुमारने आईला हात लावला आणि "आई, थोडा वेळ थांबा, मी परत येईन," असं म्हटलं होतं. हे ऐकून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. एकीकडे या घटनेने सुनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे त्याने एक नवा आदर्श ठेवला आहे.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी सुनीलने हॉल तिकीट आईच्या पायावर ठेवले आणि आशीर्वाद घेतले. पण तो रडला. त्याच्या नातेवाईकाने त्याला पकडून परीक्षा केंद्रावर नेले. सुनीलने परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यापेक्षा तुझ्या आईला दुसरे काही नको असेल, असं त्याच्या नातेवाईकाने त्याला सांगितले.
दरम्यान, याआधी लातूरमध्येही असाच प्रकार घडला होता. वडिलांचे अंत्यविधी अर्ध्यावर सोडून दिशा नागनाथ उबाळे नावाची विद्यार्थिनी दहावीची मराठीची परीक्षा देण्यासाठी आली होती. दिशाचे वडील आजाराशी झुंज देत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धाडस दाखवत, १६ वर्षीय दिशाने आपले अश्रू पुसले, वडिलांना अखेरचा निरोप दिला आणि मराठीचा पेपर देण्यासाठी औसा येथील अझीम हायस्कूलमधील परीक्षा केंद्राकडे निघाली.