खरंच की काय? महिलेने रद्दीत दिले तब्बल 5 लाखांचे दागिने अन्
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:41 AM2019-11-27T11:41:20+5:302019-11-27T11:50:18+5:30
घराची साफसफाई करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. महिलेने सफाई करताना पेपरच्या रद्दीत चुकून तब्बल पाच लाखांचे दागिने दिले.
रसीपूरम - घराची साफसफाई करताना अनेकदा पेपरची रद्दी आणि नको असलेल्या गोष्टी या रद्दीवाल्याला दिल्या जातात. काही वेळा चुकून महत्त्वाची कागदपत्रे ही रद्दीत जात असतात. पण जर कोणी लाखोंचे दागिने रद्दीत दिल्याचं सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. घराची साफसफाई करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. महिलेने सफाई करताना पेपरच्या रद्दीत चुकून तब्बल पाच लाखांचे दागिने दिले. तामिळनाडूच्या रसीपूरममध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 45 वर्षीय महिलेने घराची साफसफाई करताना चुकून दागिने रद्दीवाल्याला दिल्याची घटना समोर आली आहे. कलादेवी असं या महिलेचं नाव असून तामिळनाडूच्या रसीपूरममधील विग्नेश नगरमध्ये त्या राहतात. रद्दीवाला प्रामाणिक असल्यामुळे त्याने कलादेवींना त्यांचे पाच लाखांचे दागिने परत दिले आहेत. महिलेने रद्दी घेऊन जाण्यासाठी रद्दीवाल्याला घरी बोलावले होते. रद्दीवाला रद्दी घेऊन निघून गेला त्यानंतर रद्दीमध्ये पाच लाखांचे दागिने असल्याचं महिलेच्या लक्षात आले. मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या आणि दोन डायमंडच्या अंगठ्या या दागिन्यांचा समावेश होता. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कलादेवी यांनी या घटनेनंतर परिसरात रद्दीवाल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यामध्ये अपयश आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या माध्यमातून रद्दीवाल्याचा तपास करण्यात आला. त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं. सेल्वराज असं रद्दीवाल्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने दागिने असल्याचं मान्य केलं.
पोलिसांनी कलादेवींना त्यांचे पाच लाखांचे दागिने परत केले आहेत. परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेच वाढ झाली आहे. चोरीच्या भीतीने घरामध्ये असलेले लाखोंचे दागिने पेपरमध्ये लपवून ठेवले होते. घरातील साफसफाई करताना चुकून दागिने रद्दीमध्ये गेल्याची माहिती चौकशीदरम्यान कलादेवी यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपास करून रद्दीवाल्याचा शोध घेतला. तर त्याच्या प्रामाणिकपणावर खूश होऊन कलादेवी यांनी त्याला 10 हजारांचे बक्षिसही दिल्याची माहिती मिळत आहे.