श्रीलंकेच्या मदतीसाठी तामिळनाडूचा हात, एका महिन्याचा पगार देणार डीएमके खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:50 PM2022-05-05T17:50:59+5:302022-05-05T18:02:56+5:30
तामिळनाडू विधानसभेत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे, यात श्रीलंकेला तांदूळ आणि औषध पाठविण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याला परवानगीही दिली आहे.
श्रीलंका सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याच पार्श्वभूमीवर, तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेने आपले सर्व खासदार त्यांचा एक महिन्याचा पगार श्रीलंकेला मदत म्हणून देतील, अशी घोषणा केली आहे. यापूर्वी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी, जनतेने श्रीलंकेच्या मदतीसाठी समोर यावे आणि त्यांना आवश्यक साहित्य जमा करण्यास मदत करावी, असे आवाहन केले होते.
याशिवाय तामिळनाडू विधानसभेत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे, यात श्रीलंकेला तांदूळ आणि औषध पाठविण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याला परवानगीही दिली आहे.
यासंदर्भात बोलताना एस जयशंकर म्हणाले, श्रीलंकेला भारत सरकारकडून जी मदत दिली जात आहे, त्यात तामिळनाडूच्या योगदानामुळे वाढ होईल. तसेच, श्रीलंकेत मदत साहित्य पाठवण्यासंदर्भात राज्य सरकार तामिळनाडूच्या चीफ सेक्रेटरींना केंद्रशी समन्वय साधण्यास सांगू शकते.
श्रीलंकेसमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट -
श्रीलंका सध्या सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. देशासमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. लोकांना रेशनही मिळणे अवघड झाले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. सरकारच्या तिजोरीतील परकीय चलन जवळपास संपले आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सरकारच्या सर्व खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता तेही उघडपणे सरकार विरोधात बोलत आहेत. तर दुसरीकडे, श्रीलंका सरकार जगाकडे मदतीसाठी आवाहन करत आहे. भारतासह जगातील अनेक देश श्रीलंकेला मदत करत आहेत.