तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 03:32 PM2024-02-17T15:32:23+5:302024-02-17T15:37:42+5:30
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
विरुधुनगर : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील वेंबकोट्टई येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी स्फोट झाला. या स्फोटाच्या घटनेमुळे कारखान्यातील ९ कामगारांचा मृत्यू झाला, तर इतर सहा कामगार गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
विरुधुनगर जिल्ह्यातील वेंबकोट्टईमधील मुथुसामीपुरम येथे हा फटाका कारखाना आहे. या कारखान्याच्या मालकाचे नाव विजय असल्याचे सांगितले जाते. तसेच, कारखान्याच्या केमिकल मिक्सिंग रूममध्ये हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या स्फोटात कारखान्याजवळील चार इमारतींचेही नुकसान झाले आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, ज्या इमारतीमध्ये फटाके बनवण्याचा कारखाना सुरू होता ती इमारत जमीनदोस्त झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. सहा गंभीर जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये फटाक्यांचा मोठा उद्योग आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्हा फटाके निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखला जातो. सरकारी परवाना नसलेले अनेक बेकायदा कारखानेही येथे सुरू आहेत. अशा कारखान्यांमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने कामगार प्रत्येकवेळी आपला जीव धोक्यात घालून काम करतात.
#WATCH | Explosion occurs in a firecracker manufacturing unit in Tamil Nadu's Virudhunagar; details awaited pic.twitter.com/cALcg6A9Ow
— ANI (@ANI) February 17, 2024
गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात विरुधुनगर जिल्ह्यातील दोन फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये स्फोट झाले होते. रंगपलायम आणि किचिन्यकनपट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर १५ हून अधिक जण जखमी झाले होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील पझायापेट्टई येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. कृष्णगिरी एसपींनी या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता.