भावासोबत नाचली म्हणून मुलाने मारली चापट, नवरीने त्याच दिवशी दुसऱ्या मुलासोबत थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 07:07 PM2022-01-24T19:07:43+5:302022-01-24T19:07:52+5:30
तामिळनाडूमध्ये एका लग्नात किरकोळ कारणावरुन सुरू झालेले भांडण इतके वाढले की, लग्नाच्या दिवशीच नवरीने लग्न मोडले.
कुड्डालोर:लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन असतं. हा जीवनातील सर्वोत्तम क्षण आहे. लोक आनंदाने-उत्साहाने एकमेकांचा स्विकार करतात. 7 जन्म एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. मात्र, तामिळनाडूत सात फेऱ्यांआधीच नवरीने मुलाच्या कृत्यावर नाराज होऊन लग्न मोडून त्याच दिवशी दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याची अजब घटना घडली आहे.
मुलाने नवरीच्या मारली गालात
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये एका लग्नात किरकोळ कारणावरुन सुरू झालेले भांडण इतके वाढले की, लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीने लग्न मोडले. झाले असे की, लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत सेरेमनी सुरू होती. यावेळी नवरीचा चुलत भाऊ नवरी आणि नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत होता. यामुळे संतापलेल्या नवऱ्या मुलाने सगळ्यांसमोर नवरीच्या गालावर जोरदार चापट मारली. यानंतर नाराज मुलीने त्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला.
त्याच दिवशी दुसऱ्या मुलाशी केले लग्न
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील पाणरुती भागातील आहे. लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू होती. पण, एका शुल्लक कारणावरुन आनंदाचे वातावरण असलेल्या घरात शांतता पसरली. नवऱ्या मुलाने नवरीच्या गालात मारल्यानंतर वाद वाढला आणि मुलीने लग्नास नकार दिला.
मुलाने पोलिसांत दाखल केली तक्रार
विशेष म्हणजे, त्याच दिवशी नवऱ्या मुलीने लग्नात उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका मुलासोबत लग्न केले. एखाद्या चित्रपटात घडावी अशी घटना 20 जानेवारी रोजी घडली. ही अजब घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि यावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, लग्न मोडल्यानंतर संतापलेल्या नवऱ्या मुलाने पोलीस ठाण्यात वधूसह तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, लग्नात झालेला खर्च देण्याची मागणी केली आहे.