तामिळनाडूमध्ये संघाची सत्ता येऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:33 AM2019-04-13T05:33:56+5:302019-04-13T05:34:08+5:30
राहुल गांधी; स्टॅलिन लवकरच मुख्यमंत्री
कृष्णगिरी : तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे रा. स्व. संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असाही विश्वास त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.
राहुल गांधी म्हणाले की, नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली व ते विदेशात पळून गेले. या कर्जबुडव्यांपैकी एकही जण अद्याप तुरुंगात गेलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्ज न फेडता आलेल्या एकाही शेतकऱ्याला आम्ही तुरुंगात धाडणार नाही. कर्जबुडव्या श्रीमंत लोकांवर काहीही कारवाई होत नाही, पण त्याच गुन्ह्यापायी गरीब शेतकऱ्यांना शिक्षा सुनावली जाते हे अयोग्य आहे.
राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी, मेहुल चोकसीला प्रत्येकी ३५ हजार कोटी रुपये व विजय मल्ल्याला १० हजार कोटी रुपये दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत मोदींनी आपल्या १५ मित्रांसाठीच सरकार चालविले त्या सर्वांची नावे
जनतेला माहिती आहेत. त्यामध्ये अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोकसी आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
न्याय योजना फायदेशीर
राहुल गांधी यांनी सांगितले की, देशातील सर्वात गरिबांतील गरिब कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी न्याय योजना ही त्या लोकांमध्ये क्रयशक्ती निर्माण करेल.
अशा योजनेमुळे तामिळनाडूमध्ये नवीन कारखाने उभारले जातील तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल.
तामिळनाडूमधील वस्त्रोद्योगनिर्मितीची आगारे असलेली तिरुपूर, कांचीपुरमसारखी ठिकाणे पुन्हा पहिल्यासारखीच बहरतील. त्यातून युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.