...अन् लेकीसाठी आई 'बाप' बनली; तब्बल ३६ वर्षे पुरुष म्हणून जगली; काळीज हेलावणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 02:36 PM2022-05-15T14:36:12+5:302022-05-15T14:38:24+5:30
या मातेला सलाम! लेकीचं पोट भरण्यासाठी, तिच्या रक्षणासाठी बाप बनणारी, तब्बल ३६ वर्षे लुंगी अन् शर्ट घालणारी आई
थोत्थुकुडी: आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. म्हणूनच तर म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. याचाच प्रत्यय देणारी एक विलक्षण कहाणी तमिळनाडूच्या थोत्थुकुडीमध्ये घडली. पतीच्या निधनानंतर एक आई मुलीच्या संगोपनासाठी, तिच्या रक्षणासाठी बाप बनली. धोतर अन् शर्ट घालून थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ३६ वर्षे पुरुष म्हणून जगली.
३६ वर्षांपूर्वी एस. पेटचिअम्मल यांच्या पतीचं निधन झालं. लग्नाला अवघे १५ दिवस झाले होते. सुखी संसाराचं स्वप्न उद्ध्वस्त झालं होतं. पोटात एक जीव वाढत होता. त्याला उत्तम आयुष्य देण्यासाठी पेटचिअम्मल यांनी कष्ट करण्याचं ठरवलं. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी संकटांना आव्हान देत पेटचिअम्मल यांचा संघर्ष सुरू झाला. काही महिन्यांत त्यांनी एका मुलीला जन्म दिला. शन्मुगसुंदरी असं तिचं नामकरण करण्यात आलं.
दुसरं लग्न करायचं नाही, आपणच आपल्या लेकीला वाढवायचं, असा निश्चयच पेटचिअम्मल यांनी केला. एकटी बाई दिसल्यावर पुरुषांकडून जो त्रास होतो, त्यापासून पेटचिअम्मल यांचीही सुटका झाली नाही. लेकीला वाढवण्यासाठी पेटचिअम्मल यांनी हॉटेलांमध्ये, चहाच्या दुकानांमध्ये काम केलं. मजुरी करून पेटचिअम्मल स्वत:चं आणि लेकीचं पोट भरत होत्या. मात्र प्रत्येक ठिकाणी शोषण सुरूच होतं.
एकटी बाई म्हणजे जणू काही खुली तिजोरी, या पुरुषी मानसिकतेचा सामना सुरू होता. यापासून सुटका करून घेण्यासाठी पेटचिअम्मल यांनी 'पुरुष' होण्याचं ठरवलं. कायम साडी नेसणाऱ्या पेटचिअम्मल शर्ट आणि लुंगी घालू लागल्या. केसही त्यांनी पुरुषांप्रमाणेच कापले. तिरुचेंदूर इथल्या मंदिरात जाऊन पेटचिअम्मल यांनी आपलं नाव बदलून मुत्थू ठेवलं.
पेटचिअम्मल या मुत्थू बनून मुलीसह कट्टुनायकपट्टी येथे राहू लागल्या. कुटुंबातील मंडळी आणि लेक यांना सोडल्यास संपूर्ण जगासाठी त्या मुत्थूच होत्या. लेक मोठी झाली. तिचं लग्न झालं. मात्र आताही पेटचिअम्मल यांना पुरुषी वेश सोडायचा नाहीए. याच वेशानं माझं आणि माझ्या लेकीचं संरक्षण केलंय. त्यामुळे हा वेश मी सोडणार नाही. मी मरेपर्यंत मुत्थूच राहीन, असं पेटचिअम्मल सांगतात.
पेटचिअम्मल यांच्या आधार कार्ड, रेशन कार्ड आणि अन्य कागदपत्रांवर त्याची ओळख पुरुष म्हणूनच आहे. आता पेटचिअम्मल यांचं वयदेखील झालं. मनरेगामधून मिळणारं काम हाच त्यांच्यासाठी आता उपजीविकेचा आधार आहे. आतापर्यंत त्यांना कोणतीच सरकारी मदत मिळालेली नाही. मात्र त्यामुळे पेटचिअम्मल कुठेही थांबल्या नाहीत. लेकीसाठी त्या घरात आई होत्याच. पण घराबाहेर तिच्या संरक्षणासाठी त्या बापही झाल्या.