तामिळी तिढा कायम
By admin | Published: February 9, 2017 02:37 AM2017-02-09T02:37:58+5:302017-02-09T02:37:58+5:30
व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले
चेन्नई : व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणाऱ्या मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन, असे बुधवारी जाहीर केले असून, ‘माझी शक्ती विधानसभेतच कळेल,’ असा दावाही केला. त्यांच्या बंडामुळे राज्यपाल विद्यासागर राव यांनी चेन्नईत जाण्याचे टाळले. परिणामी शशिकला यांच्या शपथविधीविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. राव चेन्नईला कधी जाणार, हे माहीत नाही, असे मुंबईतील राजभवनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शशिकला यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी झालेल्या निवडीला निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाने त्यांच्याकडून तसेच पक्षाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आयोगाने समाधान होईपर्यंत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र १३0 पैकी एकही आमदार फुटू नये, म्हणून त्या सर्वांना एका हॉटेलात डांबण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
तामिळनाडूतील घटनांशी सरकार व भाजपा यांचा संबंध नाही, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)
शशिकला यांनी अण्णा द्रमुकच्या आमदारांची बुधवारी तातडीची बैठक बोलावली. त्यास १३0 आमदार उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. शशिकला यांच्यासमवेत अधिक आमदार असले तरी कार्यकर्ते आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यात पनीरसेल्वम यशस्वी ठरले असून, त्यांच्यावर अन्याय झाला, अशीच भावना व्यक्त होत आहे. शशिकला यांच्यापुढे हीच मोठी अडचण आहे.
पनीरसेल्वम यांच्यासोबत दोन आमदार, माजी विधानसभाध्यक्ष पांडियन व खा. मैत्रेयन उपस्थित होते. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि खासदार शशिकला पुष्पा यांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे - शशिकला
पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्यायचे नाही, असे शशिकला यांनी ठरविले असून, त्यांनी सर्व जिल्हा सचिवांना चेन्नईत बोलावून घेतले आहे. अण्णा द्रमुकमध्ये पक्षाच्या जिल्हा सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. पनीरसेल्वम द्रमुकच्या हातातील खेळणे बनले असून, करुणानिधी व स्टॅलिन यांच्या सांगण्यावरून त्यांनी मुख्यमंत्रिपद न सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शशिकला यांनी केला. त्या म्हणाल्या की, पनीरसेल्वम यांच्या धमक्यांपुढे पक्ष कदापि गुडघे टेकणार नाही. पनीरसेल्वम यांनी मात्र द्रमुकशी हातमिळवणीच्या आरोपाचे खंडन केले. राजीनाम्यासाठी माझा छळ करण्यात आला, असेही ते म्हणाले.