बँकेने चुकून कॅब ड्रायव्हरच्या खात्यात 9000 कोटी पाठवले, CEO ने दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 04:05 PM2023-09-29T16:05:23+5:302023-09-29T16:06:46+5:30
सुरुवातीला कॅब ड्रायव्हरला विश्वास बसला नाही, नंतर त्याने 21000 रुपये मित्राला पाठवले.
नवी दिल्ली: तामिळनाडू मर्कंटाइल बँकेचे (TMB) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस कृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेने चुकून चेन्नईतील एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात 9,000 कोटी रुपये जमा केल्याच्या घटनेनंतर काही दिवसांनी कृष्णन यांचा राजीनामा आला आहे. कृष्णन यांनी राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणे दिली आहेत.
कृष्णन यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, “माझ्या कार्यकाळाचा अंदाजे दोन तृतीयांश कालावधी बाकी असला तरी, वैयक्तिक कारणांमुळे मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे." कृष्णन यांनी सप्टेंबर 2022 मध्ये बँकेचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. थुथुकुडीस्थित बँकेच्या संचालक मंडळाने गुरुवारी एक बैठक घेतली आणि त्यांचा राजीनामा स्वीकारुन तो भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) पाठवला. नवीन व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत एस कृष्णन या पदावर राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर रोजी कॅब ड्रायव्हर राजकुमारच्या खात्यात 9,000 कोटी रुपये जमा झाले. सुरुवातीला राजकुमारला यावर विश्वास बसला नाही. सत्यता तपासण्यासाठी राजकुमारने त्याच्या मित्राला 21 हजार रुपये ट्रान्सफर केले, यानंतर त्याचा विश्वास बसला. मात्र, काही वेळातच बँखेने उर्वरित रक्कम परत घेतली.