मरावे परी कीर्तिरूपे उरावे! 18 वर्षीय ब्रेन डेड विद्यार्थ्याने 5 लोकांना दिलं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:48 PM2022-06-22T18:48:35+5:302022-06-22T18:54:31+5:30
Organ Donation : अपघातानंतर ब्रेन डेड घोषित झालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या अवयवदानाने 5 जणांचा जीव वाचवण्यात आला आहे.
नवी दिल्ली - मरावे परी कीर्तिरूपे उरावे अशीच एक घटना समोर आली आहे. ब्रेन डेड विद्यार्थ्याच्या अवयदानामुळे तब्बल पाच लोकांना जीवदान मिळालं आहे. 18 जून रोजी झालेल्या अपघातानंतर ब्रेन डेड घोषित झालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या अवयवदानाने 5 जणांचा जीव वाचवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूत शनिवारी झालेल्या अपघातात थेनी जिल्ह्यातील उथमपालयम येथील विद्यार्थी शक्तीकुमार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शक्तीकुमारच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मदुराई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी विद्यार्थ्याच्या आवश्यक चाचण्या केल्यानंतर ब्रेन डेड झाल्याची घोषणा केली. मदुराई येथील मीनाक्षी मिशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (MMHRC) च्या डॉक्टरांनी सांगितले की, ब्रेन डेड झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना अवयवदानाबद्दल माहिती देण्यात आली आणि समुपदेशनानंतर कुटुंबातील सदस्यांनी अवयवदान करण्यास सहमती दर्शवली.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, ऑपरेशननंतर मंगळवारी अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि हे अवयव वेगवेगळ्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये शक्तीकुमार यांची किडनी आणि यकृत प्रत्यारोपित करण्यात आले.
दुसरी किडनी त्रिची येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. त्याचवेळी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हृदय आणि फुफ्फुसं नेण्यात आले. त्यासाठी अवयवांचे एअरलिफ्ट करण्यात आले असून वेळेत अवयव प्रत्यारोपण करता यावे यासाठी शहर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.