'भाजपला देशाचे विभाजन हवे; आमच्यावर हिंदी लादू नका, अन्यथा...', CM स्टॅलिन कडाडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 05:14 PM2022-10-18T17:14:58+5:302022-10-18T17:15:58+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत हिंदीविरोधात ठराव मांडला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
चेन्नई:हिंदी विरुद्ध दाक्षिणात्य भाषा, हा वाद फार पूर्वीपासून चालत आला आहे. यातच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M. K. Stalin) यांनी विधानसभेत, राज्यात हिंदी भाषा लागू करण्याच्या विरोधात ठराव मांडला आहे. मंगळवारी विधानसभेतील भाषणादरम्यान स्टॅलिन यांनी केंद्रातील भाजप सरकारव जोरदार हल्लाही केला. ते म्हणाले की, भाजपला असे वाटते की ते केवळ हिंदी लागू करण्यासाठीच सत्तेवर आले आहेत. भाजपला हिंदी भाषेला ताकदीचे प्रतीक बनवायचे आहे, त्यांना इतर भाषा संपवायच्या आहेत. पण, आम्ही असे होऊ देणार नाही.
त्यांच्यासाठी हिंदी महत्वाची
स्टॅलिन म्हणतात की, भाजपला प्रशासनातून इंग्रजी पूर्णपणे काढून टाकायची आहे. त्यांना देशातील नागरिकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान घेण्यापासून थांबवायचे आहे. भाजप म्हणते की, राज्याची भाषा फक्त बोलण्यासाठीच आहे. पण, त्यांच्यासाठी फक्त हिंदी महत्वाची आहे. भाजपला सर्व भाषा प्रिय असतील, तर त्यांनी आठव्या अनुसूची अंतर्गत तामिळ आणि इतर भाषांना केंद्र सरकारची प्रशासकीय भाषा घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमच्यावर हिंदी लादू नका
ते पुढे म्हणाले की, आमचे राज्य दुहेरी भाषा धोरणाने (इंग्रजी आणि तमिळ) चालत आहे. सर्व प्रादेशिक भाषांना भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा अशी आमची इच्छा आहे. तामिळनाडूच्या लोकांना हे माहीत आहे, म्हणूनच ते फक्त तीन भाषांवर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध करत आहेत. बिगरहिंदी भाषिकांवर हिंदी लादू नये. बिगर हिंदी भाषिकांसाठी इंग्रजीचा पर्याय असायला हवा. केवळ हिंदी भाषिकांना प्राधान्य देऊ नये आणि असे झाल्यास ते संविधानाचे उल्लंघन ठरेल, अशी टीकाही त्यांनी यावेळे केली.
भाजपला भारताचे विभाजन करायचे आहे
स्टॅलिन पुढे म्हणाले की, 'भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारताचे तीन भागात विभाजन करू इच्छिते. हिंदी भाषिक राज्ये, ज्या प्रदेशात कमी हिंदी बोलली जाते आणि जिथे हिंदी अजिबात बोलली जात नाही, असे प्रदेश. तामिळनाडू या तिसऱ्या श्रेणीत येतो. आम्ही जुन्या भाषेचे आणि संस्कृतीचे मालक आहोत. आम्हाला तृतीय श्रेणीचे नागरिक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनी या विरोधात उभे राहून आवाज उठवला पाहिजे.'
भाजपला इतर भाषा संपवायच्या आहेत
यावेळी स्टॅलिन यांनी 1965च्या हिंदी विरोधी आंदोलनाची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, 'द्रमुकने आंदोलन सुरू केले होते आणि त्यानंतर ते पहिल्यांदाच सत्तेत आले. भाषा हे आपले जीवन, आपला आत्मा आणि आपले भविष्य आहे. मातृभाषेला इतर भाषांच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी द्रमुकची स्थापना करण्यात आली. भाजप हिंदी लागू करून, इतर भाषा नष्ट करण्याच्या विचारात आहे. 'देश एक सब एक' या धोरणाखाली त्यांना एक भाषा करायची आहे. पण, आम्ही असे काहीही होऊ देणार नाही,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.