डीआरआय विभागाची मोठी कारवाई; तमिळनाडुतून 32 कोटी किमतीची व्हेल उलटी जप्त, चार ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 01:43 PM2023-05-21T13:43:42+5:302023-05-21T13:45:02+5:30
या व्हेल माशाच्या उलटीची श्रीलंकेत तस्करी होणार होती.
तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की, व्हेल माशाच्या उलटीची काळ्या बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. भारतात अनेकदा व्हेल माशाची उलटी विकणाऱ्यांविरोधात कारवाई होत असते. आता महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तमिळनाडूच्या तुतीकोरीन किनाऱ्याजवळ 18.1 किलो व्हेल उलटी जप्त करुन तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जप्त करण्यात आलेल्या एम्बरग्रीसची किंमत 31.67 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, एक टोळी तुतीकोरीनमधील किनार्याजवळ समुद्रमार्गे एम्बरग्रीसची श्रीलंकेत तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान एका वाहनातून 18.1 किलो एम्बरग्रीस जप्त केले. गाडीत चार जण प्रवास करत होते. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित प्राणी असलेल्या स्पर्म व्हेलमधून एम्बरग्रीस(उलटी) निघते. हे एम्बरग्रीस मिळवणे किंवा त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.
एम्बरग्रीसचा वापर परफ्यूमसाठी केला जातो
डीआरआयच्या म्हणण्यानुसार, केरळ आणि तामिळनाडूतील पाच जणांना एम्बरग्रीसची तस्करी करण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे. डीआरआयने गेल्या दोन वर्षांत तुतीकोरीन किनार्यावरून 54 कोटी रुपयांचे 40.52 किलो एम्बरग्रीस जप्त केले आहे. परफ्यूम बनवण्यासाठी याचा वापर जास्त होतो.
एम्बरग्रीस हा एक मेणासारखा ज्वलनशील पदार्थ आहे, जो व्हेलच्या आतड्यांमधून बाहेर पडतो. हे व्हेलच्या शरीराच्या आत तयार होते. साधारणपणे व्हेल मासे किनार्यापासून दूर राहतात, त्यामुळे त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा हा पदार्थ समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचायला बरीच वर्षे लागतात.