NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 01:57 PM2023-08-14T13:57:46+5:302023-08-14T13:58:49+5:30
मुलाच्या विरहाने दुःखी झालेल्या वडिलांनीही गळफास घेऊन जीवन संपवले.
चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर दुःखी होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोनवेळा NEET परीक्षेत नापास झाल्यामुळे मुलाने आत्महत्या केली होती. मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुःखी झालेल्या वडिलांनी स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय एस जगदीश्वरन 2022 मध्ये बारावी पूर्ण केली आणि मेडिकलला अॅडमिशन मिळवण्यासाठी NEET परीक्षा दिली, मात्र दोन वेळा तो अपयशी ठरला. यानंतर जेगेश्वरनने शनिवारी दुपारी घरात एकटा असताना आत्महत्या केली. घरातील नोकराने त्याला आत्महत्या केलेल्या अवस्थेत पाहिले आणि शेजाऱ्याच्या मदतीने हॉस्पिटलला नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जगदीश्वरनचा अंत्यविधी पार पाडल्यानंतर त्याचे वडील सेल्वासेकर यांनीही मुलाच्या विरहाने दुःखी होऊन रविवारी नातेवाईकाच्या घरात गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी बाप-लेकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, जेगेश्वरच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांचे सांत्वन करण्याचा विचार करत होतो, पण त्यांनीही आत्महत्या केल्याची बातमी आली. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की, कोणत्याही परिस्थितीत, कोणीही जीव गमावू नये. आम्ही आता NEET काढून टाकण्याचा विचार करत आहेत. तमिळनाडू सरकार त्यासाठी काम करत आहे आणि कायदेशीर पावले उचलत आहे.