धक्कादायक! नर्सनं कोविशील्ड लसी चोरल्या; घरी नेऊन नातेवाईकांना टोचल्या अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:27 PM2021-07-27T16:27:30+5:302021-07-27T16:28:53+5:30

नर्सवर निलंबनची कारवाई; प्रकरणाची चौकशी सुरू

in tamilnadu Nurse flees with Covishield vaccine doses administers them to relatives | धक्कादायक! नर्सनं कोविशील्ड लसी चोरल्या; घरी नेऊन नातेवाईकांना टोचल्या अन् मग...

धक्कादायक! नर्सनं कोविशील्ड लसी चोरल्या; घरी नेऊन नातेवाईकांना टोचल्या अन् मग...

Next

चेन्नई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरण अभियानाला वेग देण्याची गरज आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. पहिला डोस झालेल्या अनेकांना दुसरा डोस मिळण्यास विलंब होत आहे. एका बाजूला लसींचा तुटवडा जाणवत असताना तमिळनाडूत एक भलताच प्रकार समोर आला आहे.

तमिळनाडूच्या करूरमध्ये एका नर्सनं कोरोना लस चोरल्या आणि तिच्या नातेवाईकांना, स्थानिकांना टोचल्या. चोरीचा आरोप असलेली महिला ५८ वर्षांची असून शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. लस चोरी केल्याच्या आरोपांनंतर तिला निलंबित करण्यात आलं. पी. धनलक्ष्मी असं तिचं नाव आहे. ती दिंडीगुलमधील वेदासांदूरची रहिवासी आहे. धनलक्ष्मी तिच्या घरी लसीकरण करत असल्याची माहिती वेदासांदूरच्या आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरींना मिळाली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.

रविवारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धनलक्ष्मी यांच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी तिच्या घरी कोविशील्ड लसीच्या अनेक कुपी मिळाल्या. त्यानंतर महेश्वरींनी याची माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली. सोमवारी धनलक्ष्मी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. धनलक्ष्मी यांच्या घरातून कोविशील्ड लसीच्या ८ कुप्या सापडल्याची माहिती प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं दिली. 'प्राथमिक आरोप आणि पुराव्यांच्या आधारे आम्ही संबंधित नर्सला निलंबित केलं आहे. सध्या तपास सुरू आहे. तिनं लसीच्या कुपी घरी कशा नेल्या, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे', अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: in tamilnadu Nurse flees with Covishield vaccine doses administers them to relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.