तामिळनाडूत फिल्मी स्टाईल दरोडा, चालत्या एक्सप्रेसचे छत फोडून ५ कोटी लुटले
By admin | Published: August 10, 2016 09:43 AM2016-08-10T09:43:33+5:302016-08-10T09:59:01+5:30
तामिळनाडूत चालत्या ट्रेनचे छत फोडून ५ कोटी रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १० - तामिळनाडूत चालत्या ट्रेनचे छत फोडून ५ कोटी रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. हा देशातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा असल्याचे समजते. तामिळनाडूतील सलेममध्ये मंगळवारी सकाळी घटना घडली. सलेम येथून निघालेल्या सलेम-चेन्नई एक्स्प्रेसमधून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पैसे नेले जात होते. या एक्स्प्रेसमध्ये २०० बॉक्समधून सुमारे ३०० कोटींची रक्कम नेली जात होती. मात्र त्यापैकी दोन बॉक्स गायब झाले असून ५ कोटी ७५ लाख रुपये लुटण्यात आल्याचे समोर आलं आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी त्या एक्स्प्रेसच्या बोगीच्या छताला भगडाद पाडून हे पैसे लुटले आहेत. या दरोड्याप्रकरणी काही धागेदोरे सापडले असले तरी त्याबद्दलची माहिती आम्ही आत्ताच जाहीर करू शकत नाही. ट्रेनमधील रकमेची मोजदाद सुरू असून त्यानंतरच निश्चितपणे किती रुपये लुटले गेले आहेत, हे समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले. मात्र, सुमारे 5 कोटी रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान या दरोडेखोरांनी ट्रेनच्या छताला भगदाड पाडून आत शिरून रक्कम लुटली की ते आधीपासूनच ट्रेनमध्ये उपस्थित होते व रक्कम लुटल्यानंतर पळून जाण्यासाठी त्यांनी छताला भगदाड पाडलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.