"हेल्मेट घ्या, 1 किलो टोमॅटो फ्री मिळवा"; दुकानदाराची अनोखी ऑफर, खरेदीसाठी लोकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 01:20 PM2023-07-16T13:20:23+5:302023-07-16T13:25:36+5:30
हेल्मेट खरेदी करणाऱ्याला एक किलो टोमॅटो मोफत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे संपूर्ण देशातील जनता त्रस्त आहे. लोकांच्या घरात टोमॅटोशिवाय अन्न तयार होत आहे. सध्या संपूर्ण देशात टोमॅटोचा सरासरी भाव 120 ते 140 रुपये प्रतिकिलो झाला आहे. अशा परिस्थितीत तामिळनाडूतील एक घटना सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील एका दुकानदाराने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे, ज्याचं लोक कौतुक करत आहेत.
तामिळनाडूतील एका दुकानदाराने हेल्मेट विक्रीचा व्यवसाय वाढवण्यासाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. जो कोणी हेल्मेट विकत घेईल त्याला एक किलो टोमॅटो मोफत भेट म्हणून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मग काय, लोकांची गर्दी त्याच्या दुकानाकडे वळली. सालेम जिल्ह्यातील फोर्ट भागात राहणाऱ्या मोहम्मद कासिमने हेल्मेटचा व्यवसाय वाढवण्यासाठी एक अप्रतिम जाहिरात काढली.
हेल्मेट खरेदी करणाऱ्याला एक किलो टोमॅटो मोफत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जाहिरातीची टॅग लाईनही लिहिली होती, "हेल्मेट हे डोक्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे जेवढे टोमॅटो अन्न शिजवण्यासाठी आहे." ही टॅग लाईन लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, 'हेल्मेटची किंमत 749 रुपये आहे. मी एक किलो टोमॅटो मोफत देतो. ही ऑफर गेल्या आठवड्यातच देण्यात आली असून मला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सालेममध्ये 1 किलो टोमॅटोचा भाव 120 रुपये आहे. अनेक बाईकस्वार कासिमच्या दुकानात हेल्मेट खरेदी करण्यासाठी आणि फुकटात टोमॅटो घेण्यासाठी येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.