तामिळनाडूत तृतीयपंथी पोलीस
By Admin | Published: August 24, 2016 05:16 AM2016-08-24T05:16:10+5:302016-08-24T05:16:10+5:30
राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.
चेन्नई : राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात निवड होऊन तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा त्यांना इतर दोन लिंगासोबत समान हक्क देणारे देशातील ते पहिले राज्य ठरेल.
तामिळनाडू सरकारने १३,१३७ पोलीस शिपायांच्या भरतीचे जे ताजे आदेश काढले आहेत त्यात पात्र तृतीयपंथी व्यक्तीही अर्ज करू शकतील, असे मुद्दाम नमूद केले आहे. जे ‘तृतीयलिंगी’ म्हणून अर्ज करतील त्यांना शैक्षणिक अर्हता, शारीरिक क्षमता व आरक्षणाच्या बाबतीत महिला प्रवर्गाचे निकष लागू होतील, असेही सरकारने स्पष्ट केले. ही नवी पोलीस भरती महिनाभरात सुरू होईल आणि डिसेंबरअखेर पूर्ण होईल. भरती प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ पोलिसाने सांगितले की, तसे पाहिले तर पूर्वीही तृतीयपंथींना अर्ज करण्यास मज्जाव नव्हता. फक्त त्यांना ‘पुरुष’ मानावे की स्त्री याविषयी सुस्पष्ट निर्देश नसल्याने त्यांच्या अर्जांवर पुढे कारवाई केली जाऊ शकत नव्हती. (वृत्तसंस्था)
प्रीतिका यशिनीचा लढा : तामिळनाडूत पोलीस सेवेचे दरवाजे तृतीयपंथींना खुले होण्याचे श्रेय प्रीतिका यशिनी हिला द्यावे लागेल. प्रीतिकाने ‘महिला’ म्हणून अर्ज केला होता. लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखत असे सर्व टप्पे पार करून निवड झाल्यावर सन २०१३ मध्ये ती पोलीस शिपाई म्हणून रुजूही झाली. नंतर नेहमीच्या वैद्यकीय चाचणीत ती तृतीयपंथी असल्याचे स्पष्ट झाले. तिची नियुक्ती महिला म्हणून झालेली असल्याने ती रद्द केली गेली. उच्च न्यायालयाने बडतर्फी रद्द करून तिला पुन्हा नोकरीत घेण्याचा आदेश दिला. आज प्रीतिका पोलीस उपनिरीक्षक आहे.