तामिळनाडूत भीषण अपघात, लॉरीची व्हॅनला धडक; 7 महिलांचा मृत्यू, 13 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 02:28 PM2023-09-11T14:28:39+5:302023-09-11T14:29:27+5:30
एका लॉरीने रस्त्यावर उभ्या असलेल्या व्हॅनला मागून धडक दिली, त्यानंतर व्हॅन पलटी झाली. या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला.
तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी एका लॉरीने रस्त्यावर उभ्या असलेल्या व्हॅनला मागून धडक दिली, त्यानंतर व्हॅन पलटी झाली. या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. या महिला कर्नाटकातून परतत होत्या. अपघाताच्या वेळी या महिला रस्त्याच्या कडेला बसल्या होत्या, असं पोलिसांनी सांगितले. या अपघातात 13 जण जखमी झाले असून, त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमी लोक वेल्लोर जिल्ह्यातील अंबुरजवळील ओनगुट्टई गावातील आहेत, जे 8 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील धर्मशाला येथे गेले होते. बंगळुरू-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावरील नट्टारामपल्ली येथे एका वाहनाचा टायर फुटल्याने प्रवासी थांबले होते.
'पर्यटकांना खाली उतरण्यास सांगितल्यानंतर व्हॅन चालक दुरुस्तीच्या कामात व्यस्त झाला. त्यानंतर अचानक बंगळुरूकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने व्हॅनला पाठीमागून धडक दिली आणि सात महिलांना चिरडलं. मीरा, देइवानई, सीताम्मल ऊर्फ सेल्वी, देवकी, सावित्री, कलावती आणि गीतांजली अशी मृतांची नावं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
व्हॅनमध्ये प्रवास करणारे 10 जण आणि लॉरीमध्ये प्रवास करणारे तीन जण जखमी झाले असून त्यांना तिरुपत्तूर आणि वानियमबाडी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नटरामपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती तीव्र संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करताना प्रत्येक पीडित कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील, असं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.