'Propaganda' म्हणणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना तापसी पन्नूची जबरदस्त 'थप्पड'
By महेश गलांडे | Published: February 4, 2021 08:22 AM2021-02-04T08:22:24+5:302021-02-04T08:24:13+5:30
सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा
मुंबई - राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरीआंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले मत मांडले. त्यानंतर, गाणगोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. मात्र, अभिनेत्री तापसी पन्नूने या सर्व सेलिब्रिटींना चपराक लगावली आहे.
सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्वजण एकत्र राहू, असे ट्विट सचिनने केले. या ट्विटसोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही सचिनने वापरले आहेत. त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेल्या ट्विटर वॉरवर आता इतरही सेलिब्रिटी मैदानात उतरुन आपलं मत मांडत आहेत. मात्र, तापसी पन्नूने या सेलिब्रिटींच्या मताला चपराक मारण्याचं काम केलंय.
If one tweet rattles your unity, one joke rattles your faith or one show rattles your religious belief then it’s you who has to work on strengthening your value system not become ‘propaganda teacher’ for others.
— taapsee pannu (@taapsee) February 4, 2021
जर एखादे ट्विट आपल्या ऐक्याला त्रास देत असेल, एखादा विनोद तुमचा विश्वास गमावत असेल किंवा एखादा शो तुमच्या धार्मिक श्रद्धेला तडा देईल. तर, तुम्हालाच तुम्हीच मुल्यप्रणाली आणखी ताकतवान बनण्यासाठी कार्य केले पाहिजे. मग, इतरांसाठी ते ‘Propagand Teacher' बनणार नाही.
रिहाना अन् मीना हॅरीस यांचं ट्विट
आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. मीना हॅरिसनं लिहिलं की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि विस्तीर्ण बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे.
लता दीदी अन् विराट कोहली म्हणतात
रसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत म्हटलंय की, "भारत एक गौरवशाली राष्ट्र आहे. एक भारतीय म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की, एक राष्ट्र म्हणून आम्ही कोणत्याही समस्या किंवा अडचण जनहिताच्या भावनेने सोडविण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. जय हिंद असं सांगत त्यांनीही या दोन हॅशटॅगचा वापर केला आहे. त्याचसोबत भारतीय कॅप्टन विराट कोहलीनेही ट्विट केलं आहे. "मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे.