एकाएकी ट्रेन २ किमी उलट्या दिशेने धावली; प्रवासी झाले हैराण, जाणून घ्या कारण..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:56 AM2022-05-12T08:56:48+5:302022-05-12T08:57:15+5:30
उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यातील विंध्याचलमध्ये राहणारा २० वर्षीय दिपक ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून सुरत इथं कामासाठी निघाला होता.
हरदा – छपराहून सुरतला जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एकाएकी ट्रेन पाठीमागे जात असल्याचं पाहून प्रवाशी हैराण झाले. ट्रेन मागे जात असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. जवळपास २ किमी ट्रेन रिवर्स गेल्यानंतर ती थांबली. मात्र प्रवाशांना काहीच कळालं नाही. ट्रेन मागे जाण्याचं कारण समजताच अनेकांना धक्का बसला.
उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यातील विंध्याचलमध्ये राहणारा २० वर्षीय दिपक ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून सुरत इथं कामासाठी निघाला होता. तो ट्रेनच्या दरवाजात बसला होता. त्यावेळी अचानक त्याला डुलकी लागली आणि तो ट्रेनमधून खाली कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, टीसीच्या सूचनेनंतर चालकाने २ किमी ट्रेन मागे आणत जखमी युवकाला १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला भोपाळला नेण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशनचे उपअधीक्षक राकेश पवार यांनी सांगितले की, ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून पडून युवक जखमी झाल्याची सूचना मिळाल्यानंतर कंट्रोल रूमशी चर्चा करून ट्रेन मागे घेऊन जाण्याचा निर्णय झाला. कारण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेने प्राधान्य दिले असं त्यांनी सांगितले. सूरतच्या दिशेने जाणारी ताप्ती गंगा एक्सप्रेस इटारसी जंक्शनहून हरदा स्टेशनकडे जात होती. तेव्हा एस १० कोचमध्ये बसलेला दीपक चालत्या ट्रेनमधून खाली कोसळला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी टीसीला दिली. त्यानंतर टीसीने कंट्रोल रुमशी संपर्क साधून चालकालाही या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत नातेवाईकांनी चेन पुलिंग करत ट्रेन थांबवली.
३ तास ट्रेनला उशीर
ही घटना मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या रेल्वे मार्गावर हरदा स्टेशननजीक घडली. जेव्हा युवक खाली पडला तेव्हा ट्रेन २ किमी पुढे निघून गेली होती. जखमी युवकाच्या मदतीसाठी ट्रेन २ किमी मागे गेली. त्यामुळे निर्धारित वेळेहून ३ तास उशीराने धावत होती. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वे कर्मचारी तात्काळ जखमी युवकाच्या मदतीसाठी आले. सध्या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.