काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग, पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; हल्ला पूर्वनियोजित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:58 AM2023-02-27T09:58:15+5:302023-02-27T09:58:42+5:30

एटीएम सुरक्षारक्षक असलेले शर्मा सकाळी अकरा वाजता बाजारपेठेत जात असताना घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अगदी जवळून त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली.

Target Killing Again in Kashmir, Kashmiri Pandit Killed by Terrorists in Pulwama; Attack premeditated | काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग, पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; हल्ला पूर्वनियोजित

काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग, पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; हल्ला पूर्वनियोजित

googlenewsNext

श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरातील ‘टार्गेट किलिंग’चे सत्र थांबायचे नाव घेत नसून, रविवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आणखी एका काश्मिरी पंडिताची हत्या घडवून आणली. संजय शर्मा (४०) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

एटीएम सुरक्षारक्षक असलेले शर्मा सकाळी अकरा वाजता बाजारपेठेत जात असताना घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अगदी जवळून त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. अचन भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या समुदायातील सदस्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संजय शर्मा प्रदीर्घ काळापासून कामावर येण्याचे टाळत होते, असे त्यांच्या 
सहकाऱ्यांनी सांगितले. 
हा पूर्वनियोजित हल्ला होता, असे पोलिस उपमहानिरीक्षक रईस भट यांनी सांगितले. गावात सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथेही आम्ही सुरक्षाव्यवस्था तैनात केलेली आहे, असे ते म्हणाले.  

राजकीय पक्षांकडून निषेध
अत्यंत दु:ख झाले. संजय बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. आज एका अतिरेकी हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि त्याच्या प्रियजनांप्रती शोक व्यक्त करतो, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. 
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केला. 

शिक्षकही निशाण्यावर
काश्मीरमध्ये यावर्षी अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यावर झालेला हा पहिला हल्ला होता. गेल्यावर्षी नागरिकांवर जवळपास ३० हल्ले केले. यात तीन काश्मिरी पंडित, राजस्थानातील एक बँक व्यवस्थापक, जम्मूमधील एक महिला शिक्षिका व आठ परप्रांतीय कामगारांसह १८ लोक ठार झाले.

पूँछमध्ये कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त
nपूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ रविवारी तीन तस्करांना अटक करून त्यांच्याकडून तीन किलो हेरॉईन जप्त करण्यात आले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. आरोपींत एका माजी दहशतवाद्याचा समावेश आहे. 
nअंमली पदार्थाची प्रत्येकी एक किलोची तीन पाकिटे सीमेपलीकडून पाठवण्यात आली होती. लष्कर व पोलिसांनी संयुक्त कारवाईत ही पाकिटे देगवार सेक्टरमध्ये जप्त केली. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Target Killing Again in Kashmir, Kashmiri Pandit Killed by Terrorists in Pulwama; Attack premeditated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.