सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य, पाकच्या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:59 AM2017-10-03T02:59:33+5:302017-10-03T02:59:58+5:30
पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले.
जम्मू : पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. मोहल्ला कस्बा येथील असरार अहमद (९)आणि ढिगवारच्या करमा गावातील यास्मीन अख्तर (१५) अशी दोन मृतांची नावे आहेत. पाककडून शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन होत आहे.
जखमींमध्ये पाच मुलांचा समावेश आहे. पाच वर्षीय जोबिया कौसर हिला उपचारासाठी हेलिकॉप्टरमधून जम्मूच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुंछचे आयुक्त तारिक अहमद जरगर यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर दिगर, शाहपूर, कस्बा, केरनी आणि मंधार सेक्टरमध्ये सकाळी ६.३० वाजता शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. हा गोळीबार ११.३० पर्यंत सुरु होता.
भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना विशेष उपचारासाठी विमानाने जम्मूतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य आठ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानकडून या गावात गोळीबार होत असताना या गावातील लोक गाव सोडून जाण्यास तयार नाहीत. पाकिस्तानने १ आॅगस्टपर्यंत आतापर्यंत २८५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.