आसाममध्ये तरुण गोगोई, की सर्बानंद सोनोवाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:22+5:302016-04-03T03:52:22+5:30
पूर्वोत्तरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई सध्या येथे मुख्यमंत्री आहेत.
पूर्वोत्तरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई सध्या येथे मुख्यमंत्री आहेत. उत्तम प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. १७ मे २००१ रोजी त्यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गत निवडणुकीत तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने या राज्यात निवडणूक लढविली आणि घवघवीत यशही मिळविले.
२०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ७८ जागांवर विजय मिळविला होता, तर राज्यातील एक प्रमुख पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १० जागा मिळाल्या होत्या. भाजपला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. आसाम युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटने (एयूडीएफ) ७५ मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. त्यांना १८ जागांवर विजय मिळाला, तर बोडोलँड पीपल्स पार्टीने १५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राहुल गांधी यांनी आसाममध्ये प्रचार करत युवा ब्रिगेडच्या ७ जणांना उमेदवारी दिली होती. यातील ६ जण निवडून आले होते. सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना हाच गोगोई यांच्या विजयाचा भक्कम आधार होता. शालेय मुलांना दुपारचे भोजन, ९२ हजार विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर व लॅपटॉप दिले. एक लाखांपेक्षा अधिक शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप. अशा
अनेक योजना राबविल्यामुळे काँग्रेसने मागील निवडणुकीत यश खेचून आणले. आसाम गण परिषदेबाबत स्थानिक नागरिकांना आकर्षण होते. आसामच्या मतदारांनी त्यांना सत्ताही दिली होती; पण या पक्षाला सत्तेचे सोने करता आले नाही.
भाजपने दिला नवा चेहरा
कोणत्याही राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करीत नाही; पण आसाममध्ये भाजपने केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल (५३) यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले आहे. सर्बानंद सोनोवाल यांनी २०११ मध्ये आगपमधून भाजपत प्रवेश केला होता. विद्यार्थीदशेपासूनच सोनोवाल हे राजकारणाशी जोडले गेलेले आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सोनोवाल यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी आसाम भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती.
दरम्यान, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) यांनी भाजपसोबत युती केली आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
काँग्रेसचा जुनाच उमेदवार
अनेक वर्षांपासून आसाममध्ये आपला करिश्मा सिद्ध करणारे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यापुढे यंदा भाजपचे आव्हान आहे. काँग्रेसमधून राहुल गांधी हे रणनीती आखत आहेत. आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे बदरुद्दीन अजमल हेही एक प्रमुख नेते आहेत. प्रसंगी काँग्रेस या डेमोकॅ्रटिक फ्रंटचे समर्थन घेऊ शकते.
बाहेरील नागरिकांची घुसखोरी, जातीय हिंसाचार, वीज, पाणी, रस्ते यांची समस्या हे प्रश्न प्रचारात चर्चिले जात आहेत.
एकूणच काय तर तरुण गोगोई आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी ही लढत आहे, तर काँग्रेस आणि भाजपसाठी हे निकाल त्यांच्या आगामी राजकारणाला नवे परिमाण देणारे ठरणार आहेत.
एकूण जागा : १२६
पहिल्या टप्प्यात मतदान : ४ एप्रिल रोजी ६५ जागांवर
दुसरा टप्पा : ११ एप्रिल रोजी ६१ जागांवर
मतमोजणी : १९ मे
मतदार : १ कोटी ९२ लाख
बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक
२०११ चे पक्षीय बलाबल
काँग्रेस : ७८
आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट : १८
बोडोलँड पीपल्स पार्टी : १५
आसाम गण परिषद : १०
भाजप : ५