ऑक्सिजन वाटपासाठी कोर्टाने नेमला टास्क फोर्स, वैज्ञानिक, न्याय्य पद्धतीने वितरणाचा हेतू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:32 AM2021-05-09T01:32:42+5:302021-05-09T06:52:59+5:30
केंद्र सरकारकडून राज्यांसाठी केलेल्या ऑक्सिजनचे वाटप नव्याने करावे, असे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट करताना टास्क फोर्सची स्थापना करण्याचा आदेश दिला.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने देशभरात सर्वत्र वैज्ञानिक, तर्कसंगत आणि न्यायसंगत पद्धतीने ऑक्सिजनचे वाटप व्हावे यासाठी १२ सदस्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय टास्क फोर्स नियुक्त केला आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांनी चर्चेअंती टास्क फोर्समधील सदस्यांची नावे निश्चित केली. कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनसोबत इतर औषधे नीटपणे मिळत आहेत की नाही, यावरही टास्क फोर्स लक्ष ठेवणार आहे. आठवडाभरात हा टास्क फोर्स काम करू लागेल. (The task force appointed by the court for oxygen distribution is aimed at scientific, equitable distribution)
केंद्र सरकारकडून राज्यांसाठी केलेल्या ऑक्सिजनचे वाटप नव्याने करावे, असे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट करताना टास्क फोर्सची स्थापना करण्याचा आदेश दिला. याबाबत निर्णय देताना कोर्टाने म्हटले आहे की, या महामारीच्या भीषण संकटाला तोंड देताना देशातील आघाडीच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सने केलेल्या महत्त्वाच्या सूचनांमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षमपणे काम करू शकेल. टास्क फोर्समुळे जाणकार मंडळी एकत्र येऊन या संकटावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध रणनीती आखू शकतील. या टास्क फोर्सचा अहवाल केंद्र सरकार आणि कोर्टाला पाठविला जाईल.
मुंबईतील दोन डॉक्टरांची निवड
या १२ जणांच्या टास्क फोर्समध्ये मुंबईतील फोर्टिस रुग्णालयातील क्रिटिकल केअर मेडिसिन अँड आयसीयूचे संचालक डॉ. राहुल पंडित आणि हिंदुजा रुग्णालयातील कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन डॉ. झरीर एफ. उदवाडिया यांचा समावेश करण्यात आला आहे.
टास्क फोर्समध्ये मुंबईतील दोन डाॅक्टर
१२ जणांच्या टास्क फोर्समध्ये मुंबईतील डॉ. राहुल पंडित आणि डॉ. झरीर एफ. उदवाडिया यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. राहुल पंडित हे दोन दशकांहून अधिक काळ अतिदक्षता विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन आणि अतिदक्षता विभागाचे संचालक आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जॉइंट फॅकल्टी ऑफ इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली आहे. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे ते उपाध्यक्षही आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाकाळात राज्याच्या कोरोना टास्क फोर्समध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉ. झरीर उदवाडिया हे वरिष्ठ छातीविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. उदवाडिया हे एफसीसीपी (अमेरिका), एफआरसीपी (लंडन) आणि हिंदुजा रुग्णालयांशी संलग्न आहेत. क्षयरोग, न्यूमोनिया, अस्थमा, ब्राँकॉस्कॉपी, झोपेचे विकार, सार्कोइडोसिस या वैद्यकीय आजार शाखेत निष्णात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १७० हून अधिक वैद्यकीय संशोधन जर्नलमध्ये त्यांचे अहवाल प्रकाशित झाले आहेत.