बलात्कार व खुनापेक्षा हस्तमैथुन केलेलं चांगलं- तस्लिमा नसरिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:48 IST2018-02-14T12:53:09+5:302018-02-14T13:48:04+5:30
दिल्लीतील बसमध्ये एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याच्या प्रकरणावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी मत मांडलं आहे.

बलात्कार व खुनापेक्षा हस्तमैथुन केलेलं चांगलं- तस्लिमा नसरिन
नवी दिल्ली- दिल्लीतील बसमध्ये एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याच्या प्रकरणावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी मत मांडलं आहे. हस्तमैथुन करणं हा अपराध मानू नये, असं मत तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केलं आहे. पण, तस्लिमा नसरिन यांच्या या वक्तव्यावर ट्विटरकरांनी मात्र सहमती दर्शविली नाही. दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये एक व्यक्ती हस्तमैथुन करत होता. रेप कल्चरमध्ये याला मोठा अपराध समजला जाऊ नये. पुरूषांनी बलात्कार किंवा खून करण्याऐवजी हस्तमैथुनच करावं. सार्वजनिक स्थळावार हस्तमैथुन करणं गुन्हा आहे का ? खरं तर हा असा गुन्हा आहे की, ज्यामध्ये कोणी पीडित नसतं, असं ट्विट तस्लिमा नसरिन यांनी केलं.
तस्लिमा नसरिन यांचं हे वक्तव्य ट्विटर युजर्सला रूचलं नसल्याने सोशल मीडियावर या वक्तव्याला मोठा विरोध होताना दिसतो आहे. आम्ही मॉडर्न होतो आहे, याचा अर्थ आम्ही निर्लज्ज होतो आहे असा नाही, असं मत एका ट्विटर युजरने व्यक्त केलं. हस्तमैथुन, शारीरिक संबंध सार्वजनिक ठिकाणावर योग्य नाही, अशीही कमेंट सोशल मीडियावर करण्यात आली. हा गुन्हा असून अजाणतेपणे असं कृत्य पाहणाऱ्याला धक्का बसतो असं एका युजरने म्हणत आपल्याच एका नातेवाईकाचे उदाहरणही दिलं आहे.
सोशल मीडियावरील या कमेन्ट्सनंतर तस्लिमा नसरिन यांनी मंगळवारी आणखी एक ट्विट केलं. 'बस, ट्रेन, गल्ली-बोळ्या, गर्दीची ठिकाणं, रात्र, दिवस, शाळा, ऑफिस इतकंत नाही, तर घरातही महिला सुरक्षित नाहीयेत. या सगळ्याचं कारण पुरूष आहेत. त्यांना स्त्रीयांबद्दल असलेली द्वेषाची भावना कमी करायला हवी, त्यांच्या अशा वागण्याने अर्धी लोकसंख्या आरामात जीवन जगेल, असं तस्लिमा नसरिन यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं. दरम्यान, पहिल्या ट्विटमधून तस्लिमा नसरिन यांनी उपरोधिकपणे टोला लगावला याबद्दल काही स्पष्टता नाही.
नेमकं प्रकरण काय?
काय आहे प्रकरण
दिल्ली विद्यापीठात शिकणारी एक तरुणी ७ फेब्रुवारी रोजी बसने वसंत व्हिलेजमधून आयआयटी गेट येथे जात होती. ‘सकाळी बसमध्ये गर्दी होती. माझ्या बाजूला बसलेला तरुण हस्तमैथुन करत होता. तो मला सारखा हातही लावत होता. मी जेव्हा लोकांना याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं. कुणीही मदतीला पुढे आलं नाही. मी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड केला. मी त्या व्यक्तीला ओरडून जाब विचारला पण त्याने लक्ष दिलं नाही, असं त्या मुलीने म्हंटलं.