आजच्याच दिवशी 75 वर्षांपूर्वी एअर इंडियाचा पहिला परदेश दौरा; मुंबई ते लंडनचे भाडे फक्त 1720 रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:32 IST2023-06-08T17:29:52+5:302023-06-08T17:32:12+5:30
जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते.

file photo
नवी दिल्ली: 75 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 8 जून 1948 रोजी एअर इंडियाच्याविमानाने पहिल्यांदा परदेशात उड्डाण केले होते. एअर इंडियाने पहिल्यांदाच 35 प्रवाशांसह परदेशी भूमीवर पाऊल ठेवले. आज 8 ते 10 तासांमध्ये होणाऱ्या प्रवासाला तेव्हा दोन दिवस लागले होते. एअर इंडियाच्या मलबार प्रिन्सेस विमानाने मुंबई(तेव्हा बॉम्बे)वरुन लंडनसाठी पहिले उड्डाण केले होते.
48 तासांत पूर्ण झाला प्रवास
कायरो आणि नंतर जिनिव्हा मार्गे एअर इंडियाचे पहिले परदेशात उड्डाण यशस्वीपणे पूर्ण करणारे कॅप्टन केआर गुजदार यांनी या विमानाचे नेतृत्व केले होते. एअर इंडियाने मुंबई ते लंडन हे पहिले उड्डाण 48 तासांत पूर्ण केले होते. एअर इंडियाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. टाटा एअर इंडियाच्या फ्लाइटमधून लंडनला जाणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे काढण्यात पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती. एअर इंडियाची मलबार प्रिन्सेस 35 प्रवाशांसह नियोजित वेळेवर निघाली. यातील 29 प्रवासी लंडनला तर 6 जण जिनिव्हाला उतरले होते.
विमानात कोण कोण होते...
एअर इंडियाने 3 जून 1948 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी पूर्ण पानाची जाहिरात केली होती. पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानाचे तिकीट फक्त 1720 रुपये होते. पायलट व्यतिरिक्त फ्लाइटचे क्रू मेंबर्सही खूप उत्साहित होते. निळा कोट आणि स्काय ब्लू स्कर्ट घातलेली एअर होस्टेसही तिच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सज्ज होती. जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते. या विशेष विमानात महाराजा दुलीप सिंग, काही इंग्रज आणि व्यापाऱ्यांसह काही खेळाडूदेखील होते. आज या प्रवासाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.