टाटाच्या कार महागल्या
By Admin | Published: October 19, 2016 03:06 PM2016-10-19T15:06:30+5:302016-10-19T15:06:30+5:30
वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत 12 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 19 - वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत 12 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. उत्पादन साहित्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे टाटाने हा निर्णय घेतला आहे.
टाटा मोर्टर्सने नॅनो नव्याने बाजारात आलेल्या टियागो आणि अरिया या कारच्या किमती 2 लाख 15 हजारापासून 16.3 लाख रुपयांपर्यंत आहेत. वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या स्टील तसेच झिंकच्या किमतीत गेल्या काही काळात वाढ झाली आहे. त्यामुळे टाटाला या वाहनांच्या किमतीत वाढ करावी लागली आहे.
आमच्या प्रवासी वाहनांच्या किमतीमध्ये एक टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे आमच्या सर्व प्रवासी वाहनांच्या किमतीत पाच ते 12 हजार रुपयांनी वाढ होणार आहे. उत्पादन खर्च वाढल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यापार विभागाचे अध्यक्ष मयांक पारिक यांनी सांगितले.
याआधी टाटाची वाहन निर्मिती क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या काही प्रवासी आणि लहान व्यावसायिक वाहनांच्या किमतीत या महिन्यापासून एक टक्क्याने वाढ केली होती. तर हुंडाई मोटर इंडिया आणि मारुती सुझुकी इंडियानेही आपल्या वाहनांच्या किमतीत 20 हजार रुपयांनी वाढ केली होती.