Tata Group in Corona Fight: रतन टाटांचा 'नो लिमिट'चा मंत्र; कोरोनाविरुद्धच्या लढाईत करणार २००० कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:34 PM2021-05-04T12:34:41+5:302021-05-04T12:50:32+5:30

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने 'नो लिमिट' (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे.

Tata group companies in mission mode in war against Corona; will pour 2000 crore in 'no limit' initiative | Tata Group in Corona Fight: रतन टाटांचा 'नो लिमिट'चा मंत्र; कोरोनाविरुद्धच्या लढाईत करणार २००० कोटींचा खर्च

Tata Group in Corona Fight: रतन टाटांचा 'नो लिमिट'चा मंत्र; कोरोनाविरुद्धच्या लढाईत करणार २००० कोटींचा खर्च

Next

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. सोमवारी कोरोनाचे ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळून आले, तर ३ लाख ७३२ रुग्ण बरे झाले. या दिवशी कोरोनामुळे ३४१७ जण मरण पावले आहेत. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९९२५६०४ झाली आहे, तर उपचाराधीन रुग्णांचा आकडा ३४१३६४२ आहे.

आतापर्यंत १६२९३००३ जण कोरोनातून बरे झाले, तर बळींची एकूण संख्या २१८९५९ आहे. देशात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.७७ टक्के झाले आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमधील रुग्णालयांची क्षमता संपली असल्यानं आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रुग्णालयातील परिस्थिती विदारक आहे. रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचदरम्यान टाटा समूह देशाच्या मदतीसाठी पुन्हा धावून आला आहे. 

टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहे, ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होतील. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने 'नो लिमिट' (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी तब्बल २००० कोटी रुपये खर्च करणार आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात टाटा समूहाची जो नफा झाला त्याच रकमेतून दे २००० कोटी रुपये टाटा समूह गुंतवत असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर आता टाटा समूह लस उत्पादक कंपन्यांसोबतही करार करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अॅंड एअरोस्पेस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाला यांनी इकोनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार टाटा स्टील, टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स, टाटा मोटर्स, भारतीय हॉटेल्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा इंटरनॅशनल, व्होल्टास आणि टाटा प्रोजेक्ट्स अशा सर्व टाटाच्या कंपन्या कोरोनाच्या या संकटात देशाला मदत करण्यासाठी आपापल्या परीने काही रक्कम देत आहे. निधी उभारण्याबरोबरच विविध स्त्रोतांच्या माध्यमातून हजारो हॉस्पिटल्स उभारण्यात येणार आहेत. तसेच ऑक्सिजनचं नियोजन आणि हेल्थकेअर स्टाफला ट्रेनिंग यासारख्या गोष्टींचाही यामध्ये समावेश आहे. यासाठी टाटा ग्रुप सुमारे २,००० कोटी रुपये खर्च करणार असलं तरी यासाठी खर्चाच्या मर्यादेचं बंधन ठेवलेलं नाही. 

रतन टाटा हे नेहमीच संकटातील लोकांना मदत करण्यासाठी पुढे येतात. टाटा समूह हा नेहमीच अशा मोठ्या संकटवेळी संपूर्ण देशाला मदत करण्यासाठी तत्पर असतो. कोरोनाचं संकट ओढवल्यापासून रतन टाटा यांनी विविध पद्धतीने लोकांपर्यंत आपला मदतीचा हात कायम पोहोचेल याची काळजी घेतली आहे. गेल्यावर्षी देखील रतन टाटा यांनी कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टतर्फे १५०० कोटींची मदत जाहीर केली होती.आता टाटाने आखलेल्या या 'नो लिमिट' योजनेचा देखील गरजूंना मोठा आधार मिळणार आहे.

लस निर्मिती कंपन्यांसोबत टायअप करणार

कोरोनाच्या या काळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी टाटा ग्रुपमधील बनमाली अग्रवाल, प्रेसिडेंट ग्रुप ऑफ हॉटेल्स, टाटा इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अँड एअरोस्पेस, टाटा सन्स, टाटा स्टील, टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टाटा इंटरनॅशनल, व्होल्टास, टाटा प्रोजेक्ट या कंपन्या काम करत आहेत. यांपैकी काही कंपन्यांनी गेल्या वर्षी कोविड काळ सुरु झाल्यानंतर जीवरक्षक उपकरणं उपलब्ध करुन देण्यात मदत केली होती. टाटा ग्रुप लस निर्मिती कंपन्यांसोबत टायअप करण्याच्याही विचारात आहे.

Web Title: Tata group companies in mission mode in war against Corona; will pour 2000 crore in 'no limit' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.