TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 04:52 PM2024-06-30T16:52:14+5:302024-06-30T16:55:02+5:30

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने १५५ कर्मचारी सदस्यांना त्यांना कंपनीतून बाहेर काढल्याच्या नोटिसा पाठवाव्या लागल्या आहेत.

Tata Institute of Social Sciences fired 155 employees without any notice | TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण

TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण

Tiss Lyoffs : भारतातील प्रमुख सामाजिक विज्ञान संस्था टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (टीस) अचानक आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने शुक्रवारी त्यांच्या चार कॅम्पसमधील एकूण १५५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यामध्ये ५५ शिक्षक कर्मचारी आहेत तर ६० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याचे म्हटलं जात आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने गुवाहाटी कॅम्पसमधून सर्वात जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. गुवाहाटी कॅम्पसमधील शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. बडतर्फ केलेले कर्मचारी हे एक दशकाहून अधिक काळ संस्थेसोबत काम करत होते आणि ते सर्व कंत्राटी होते. मात्र कर्मचाऱ्यांना कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचे कारण टाटा एज्युकेशन ट्रस्टचे अनुदान मिळत नसल्याचे सांगण्यात आलं आहे. टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून अनुदान न मिळाल्याने
कर्मचाऱ्यांना पगारही देण्यात आलेला नाही.

शुक्रवारी,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांना करार समाप्त होत असल्याची पत्रे पाठवली होती. या पत्रातून कर्मचाऱ्यांना कळण्यात आले की त्यांच्या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही आणि ३० जून २०२४ रोजी सेवा समाप्त होईल. त्यामुळे टाटा एज्युकेशन ट्रस्टने यापूर्वी निधी उपलब्ध करून दिलेले हे कर्मचारी अनेक वर्षांच्या सेवेनंतर बेरोजगार झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कर्मचारी २००८ पासून संस्थेत आहेत. 

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने मुंबई कॅम्पसमधील २०, हैदराबादमधील १५, गुवाहाटी कॅम्पसमधील १४ आणि तुळजापूर कॅम्पसमधील ६ शिक्षकांना काढून टाकले आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडीजमध्ये प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जुलै आहे.
 

Web Title: Tata Institute of Social Sciences fired 155 employees without any notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.